‘भाजी चिरण्याची योग्य पद्धत’ या संदर्भातील संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘भाजी चिरण्याची योग्य पद्धत’ या संदर्भातील संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने स्वयंपाकाचे आचार, स्वयंपाकातील घटक, स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती इत्यादींच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनाच्या निष्कर्षांतून हिंदु धर्माने स्वयंपाकाच्या आचारांच्या संदर्भात घालून दिलेले नियम आणि सांगितलेली सूत्रे किती योग्य आहेत, तसेच आताच्या आधुनिक काळातही ती किती तंतोतंत लागू पडतात, हे लक्षात येते. असेच एक संशोधन पुढे दिले आहे.

सर्वसाधारण गृहिणी स्वयंपाक बनवतांना पोळी, भाजी, आमटी, भात, चटणी, कोशिंबीर हे पदार्थ प्रतिदिन बनवते. पेठेतून (बाजारातून) स्वयंपाकासाठी लागणारे धान्य, भाज्या इत्यादी घरी आणल्यावर ते निवडणे, स्वच्छ करणे इत्यादी कृती ती नित्यनेमाने करते. अन्नपदार्थ बनवतांना करण्यात येणार्‍या कृतींचा त्या अन्नपदार्थावर परिणाम होतो. त्यामुळे भाजी चिरणे, मोडणे, शिजवणे अशा सर्व कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

भाजी चिरण्यासाठी आजकाल बहुतांश गृहिणी सुरीचा, तर काहीजणी विळीचा उपयोग करतात. काही भाज्या हाताने मोडता येतात, उदा. घेवडा, गवार इत्यादी. ‘भाजी चिरण्यासाठी सुरी किंवा विळी यांचा उपयोग करणे किंवा भाजी हाताने मोडणे या कृतींचा भाजीवर, तसेच ती चिरणार्‍यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

बहुतांश गृहिणी बाजारपेठेतून भाजीपाला विकत आणतात. काही गृहिणी परसबागेत (घरामागील मोकळ्या जागेत), तर काहीजणी स्वयंपाकघराला जोडून असलेल्या लहान आगाशीत (गच्चीत) काही निवडक भाज्यांची लागवड करतात. या चाचणीसाठी एका साधिकेच्या नातेवाइकांच्या घराच्या परसबागेतील घेवडा घेण्यात आला. तुलनेसाठी म्हणून तेथील पेठेतून (बाजारातून) घेवडा विकत आणून त्याचीही निरीक्षणे करण्यात आली.

सौ. मधुरा धनंजय कर्वे

२. पेठेतील घेवड्यापेक्षा घरी लावलेल्या घेवड्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

पेठेतील घेवड्यामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून १२ ते १६ मीटर म्हणजे पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. याउलट घराच्या परसबागेतील घेवड्यामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून ७.२२ मीटर म्हणजे पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने पेठेतून आणलेल्या अन्य काही भाज्यांचीही, उदा. कांदे, बटाटे, काकडी, टॉमेटो, आले, पालक इत्यादींची निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांतून पेठेतील भाज्यांमध्ये ४ ते ११ मीटर नकारात्मक, तर ०.८० ते २ मीटर सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले. तसेच या भाज्या सुरीने चिरल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी झाल्याचे आढळून आले.

२ अ. विश्लेषण : पेठेतील भाज्यांमध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अधिक आढळण्याची विविध कारणे आहेत, उदा. पेठेतील वातावरण रज-तमप्रधान असणे, भाज्या साठवण्याचे ठिकाण, भाज्या हाताळण्याची पद्धत अयोग्य असणे इत्यादी. यांमुळे पेठेतील भाज्या रज-तमाने भारित होतात, तसेच त्यांच्याभोवती त्रासदायक स्पंदनांचे आवरण निर्माण होते. ते त्रासदायक आवरण काढण्यासाठी त्या घरी आणल्यावर निवडणे, स्वच्छ करणे यांसह त्यांवर विभूती फुंकरणे किंवा विभूतीच्या पाण्याने स्वच्छ करणे इत्यादी कृती प्रार्थना अन् नामजपासह करणे महत्त्वाचे आहे. यामुळे भाज्या स्थुलातून स्वच्छ होतील अन् त्यांच्यावरील आवरण नाहीसे होऊन आपल्या आरोग्यासाठीही हितावह ठरतील.

३. घेवडा विविध पद्धतीने चिरल्याने घेवड्यावर झालेले परिणाम

या चाचणीत साधिकेने घराच्या परसबागेतील घेवडा पुढील ३ पद्धतीने चिरल्यानंतर त्या भाज्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.

बाजूला दिलेल्या सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. सुरीने कापलेल्या घेवड्यामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अत्यल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

२. विळीवर चिरलेल्या घेवड्यामध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

३. हाताने मोडलेल्या घेवड्यामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

यातून ‘भाजी सुरीने कापण्यापेक्षा विळीवर चिरणे किंवा हाताने मोडणे लाभदायी आहे’, हे लक्षात येते.

३ अ. विश्लेषण : भाजी चिरण्याची कृती करतांना निर्माण होणार्‍या नादातून वायूमंडलात त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते. त्यामुळे भाजी त्रासदायक स्पंदनांनी भारित होते. यासाठी भाजी चिरतांना प्रार्थना आणि नामजप करत अन् सात्त्विक पद्धतीने (टीप) चिरणे आवश्यक आहे.

टीप : सात्त्विक पद्धतीने भाजी चिरणे म्हणजे ती चिरतांना तिच्या फोडींचा आकार कसा अन् किती असावा ? भाजी गोल, उभी किंवा तिरप्या आकारात चिरल्याने भाजीवर, तसेच ती ग्रहण करणार्‍यांवर (खाणार्‍यांवर) होणारा परिणाम इत्यादी संदर्भातील संशोधन अन्य लेखात दिले आहे.

४. विविध पद्धतीने घेवडा चिरल्याने साधिकेवर झालेले परिणाम 

घेवडा विविध पद्धतींनी चिरण्यापूर्वी आणि चिरल्यानंतर साधिकेच्या चाचण्या करण्यात आल्या.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

४ अ. साधिकेने घेवडा सुरीने कापल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत २५ टक्क्यांनी वाढ होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा ४० टक्क्यांनी न्यून झाली.

४ अ १. विश्लेषण : सुरीने भाजी चिरतांना सुरी पुढून मागे ओढून चिरली जाते. यातून निर्माण होणार्‍या त्रासदायक स्पंदनांमुळे वायूमंडल दूषित होते. तसेच सुरीने भाजी चिरतांना ती शक्यतो उभे राहून चिरली जात असल्याने भाजी चिरणार्‍या व्यक्तीच्या देहाची कोणतीही संरक्षक मुद्रा निर्माण होत नाही. त्यामुळे तिच्या मनातील रजोगुणी विचारांना वेग प्राप्त होतो. याचा विपरीत परिणाम भाजी चिरणार्‍यावर होतो.

४ आ. घेवडा विळीवर चिरल्यानंतर साधिकेतील नकारात्मक ऊर्जा ८० टक्क्यांनी न्यून होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा २५ टक्क्यांनी वाढली.

४ आ १. विश्लेषण : भाजी चिरतांना विळीवर बसून, उजवा गुडघा पोटाशी, म्हणजेच वर घेऊन भाजी चिरतात. विळीवर उजवा गुडघा वर घेऊन बसण्याच्या होणार्‍या मुद्रेतून स्त्रियांच्या रजोगुणी विचारांवर नियंत्रण राहून भाजी चिरणे, ही प्रक्रिया कुठल्याही त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होण्यापासून मुक्त रहाते. भाजी चिरतांना नेहमी वरून खालच्या दिशेने चिरावी, म्हणजेच भाजी चिरण्याच्या नादातून उत्पन्न होणारी त्रासदायक स्पंदने भूमीत लगेचच विसर्जित होण्यास साहाय्य होते.

४ इ. घेवडा हाताने मोडल्यानंतर साधिकेतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा ३० टक्क्यांनी वाढली.

४ इ १. विश्लेषण : सुरीने भाजी चिरतांना ज्या प्रकारे त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते तशी हाताने भाजी मोडतांना होत नाही. त्यामुळे भाजी, तसेच भाजी चिरणारी व्यक्ती यांच्यावर नकारात्मक परिणाम होत नाही. सरसकट सर्वच भाज्या हाताने मोडता येत नाहीत. काही ठराविक भाज्याच हाताने मोडता येतात. त्यामुळे किमान हाताने मोडता येतात अशा भाज्या तरी आवर्जून हाताने मोडाव्यात, तसेच या कृतीला प्रार्थना अन् नामजपाची जोड द्यावी.

५. निष्कर्ष

थोडक्यात ‘स्त्रियांनी सुरीने भाजी कापण्यापेक्षा विळीवर भाजी चिरणे किंवा हाताने भाजी मोडणे त्यांच्यासाठी लाभदायी आहे’, हे यातून लक्षात येते.

काही स्त्रियांना गुडघेदुखी किंवा अन्य व्याधींमुळे खाली भूमीवर बसून विळीवर भाजी चिरणे शक्य होत नाही. त्यामुळे त्या उभे राहून सुरीने भाजी चिरतात. अशा वेळी त्यांनी प्रार्थना करून नामजप करत भाजी चिरावी; त्यामुळे त्यांच्याभोवती नामजपाचे संरक्षक कवच निर्माण होऊन त्यांचे त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होईल. ज्यांना खाली बसून विळीवर भाजी चिरणे शक्य आहे, त्यांनी आवर्जून तसे करावे आणि जोडीला प्रार्थना अन् नामजपही करावा.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.८.२०२२)

ई-मेल : [email protected]