‘आजकाल जो तो उठतो आणि प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत किंवा सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करत आहेत, ‘भारताला मंदिरे नाही, तर केवळ रुग्णालयाची आवश्यकता आहे.’ काही अंशी ते खरेही मानले, तरी मानवतेच्या दृष्टीकोनापेक्षाही मंदिर आणि त्यापेक्षाही हिंदु धर्म यांविषयीचा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन यांतून व्यक्त होतो. मंदिर हे प्रार्थनास्थळ आहे. तेथे सर्वांना शांतता, आत्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मंदिरामुळे कुणाची व्यक्तीगत हानी झाली, असे एकही उदाहरण नाही.
१. हिंदु धर्मासह प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला प्रार्थना करण्याचा घटनात्मक अधिकार
जे मंदिराला विरोध करतात, ते तिथे जात नाहीत; परंतु दुसर्यांच्या धर्मभावना दुखावतात की, जे भारतीय राज्यघटनेविरुद्ध आहे. राज्यघटनेने सर्वांनाच स्वधर्म भावना पाळण्याचा अधिकार दिला आहे, हे मी येथे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. म्हणूनच जे मंदिराच्या ऐवजी रुग्णालय बांधू इच्छितात, त्यांनी पुढाकार घेऊन रुग्णालये अवश्य बांधावीत; पण ‘मंदिर बांधूच नये’, हे म्हणणे चुकीचे आहे. त्यांना माझा ठाम विरोध आहे. मंदिर हे हिंदूंचे धार्मिक प्रार्थनास्थळ आहे. अशीच प्रार्थनास्थळे मुसलमानांसाठी मशीद, ख्रिस्त्यांसाठी चर्च, पारशी समाजासाठी गिरिजाघर, तर शिखांसाठी गुरुद्वारा आहेत; परंतु टीकाकार केवळ हिंदूंच्या मंदिरांवर अधिक तुटून पडतात. प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला प्रार्थना करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, तसाच तो हिंदूंनाही आहे.
२. स्वतः कोणतेही सामाजिक कार्य न करणार्यांना मंदिरांवर टीका करण्याचा काय अधिकार ?
येथे एक सूत्र आवर्जून निदर्शनास आणून द्यायचे आहे की, मंदिरे ही सरकारी खर्चाने बांधलेली नाहीत, म्हणजे कराच्या (‘टॅक्स’च्या) पैशांतून नाही, तर लोकवर्गणीतून किंवा दानातून निर्माण झाली आहेत. मंदिरांना कोणतेही सरकारी अनुदान देण्यात आलेले नाही. अनेक मंदिरांची संस्थाने कित्येक वर्षांपासून रुग्णालय आणि इतर अनेक सोयीसुविधा विनामूल्य अथवा माफक दरात उपलब्ध करून देत आहेत, तेही कोणतेही सरकारी अनुदान न घेता ! मंदिरे सरकारला करही देतात. मंदिरांनी कुणालाही दान (अर्पण) देण्यासाठी सक्ती केली नाही. अनेक भाविक आपापल्या कुवतीनुसार मंदिरांना दान देतात, ती त्यांची श्रद्धा आहे. त्यासाठी त्यांच्यावर कोणतीही मंदिरे बळजोरी करत नाहीत. असे असतांना मंदिरांवर टीका करणारे स्वतः कोणतेही दान करत नाहीत; परंतु टीका मात्र नक्की करतात.
‘मंदिरांच्या ऐवजी रुग्णालये उभारा’, असे म्हणणे… मुळात जे कोणतेही सामाजिक कार्य करत नाहीत, त्यांना असा दुसर्यांवर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही.
३. सरकारने रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये यांची संख्या वाढवण्ो आवश्यक !
रुग्णालय आणि आरोग्य सुविधा पुरवणे, हे सरकारचे कार्य आहे. सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवावी. जी महाविद्यालये अस्तित्वात आहेत, त्यांच्या जागा वाढवाव्यात. प्रत्येक राज्यात एक ‘एम्स्’ रुग्णालय आणि प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे. वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क (फी) अल्प असावे. तेथे शिकून सज्ज होणार्या डॉक्टरांना शासकीय रुग्णालयामध्ये काही वर्षे सेवा बंधनकारक असावी. धार्मिक आधारावर कोणत्याही धर्माला अनुदान (सबसिडी) न देता तो सर्व पैसा हा आरोग्यसेवेसाठी वापरावा.
४. धर्मभावना दुखावणार्यांना चेतावणी
जो कुणी मंदिर आणि हिंदु धर्म यांवर विनाकारण टीका करील अन् हिंदूंच्या धर्मभावना दुखावेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’
– अधिवक्ता किरण क्षत्रिय
(साभार : सामाजिक माध्यम)