आदिगुरु भगवान शिवाच्या मुखातून प्रकटलेली गुरुगीता आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी उलगडलेला तिचा भावार्थ !

श्रीविष्णुस्वरूप सिच्चदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष सदर !

‘श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची जन्मतिथी वैशाख कृष्ण सप्तमी (११.५.२०२३) या दिवशी आहे. त्यांचा जन्मोत्सव म्हणजे जगभरातील साधकांसाठी भक्तीमय आनंदाची दिव्य पर्वणीच ! सर्वच साधक श्री गुरूंच्या जन्मोत्सवाची अत्यंत उत्कंठेने प्रतीक्षा करत असतात. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कार्यरत झालेल्या नवचैतन्यामुळे साधकांच्या अंतरातील भक्तीभाव आणि साधनेचे प्रयत्न यांमध्ये आपोआप वाढ होते.

या दिव्य आनंदपर्वात साधकांचा श्री गुरूंप्रती असलेला भाव आणखी जागृत होण्यासाठी श्री गुरुकृपेने एक अनुपम्य (अनुपमेय) संधी लाभत आहे. श्री गुरूंविषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पार्वतीमातेने महादेवाला जिज्ञासेने विविध प्रश्न विचारले. तेव्हा आदिगुरु महादेवांच्या श्री मुखातून साक्षात् ‘श्री गुरुगीता’ प्रकटली होती.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘तस्मै श्री गुरवे नमः ।’ या विशेष सदरातून ‘गुरुगीतेतून वर्णिलेले ‘श्री गुरुमाहात्म्य’ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !’ १.५.२०२३ पासून प्रसिद्ध करत आहोत. यातून साधकांच्या अंतर्मनावर गुरुमाहात्म्य बिंबण्यास साहाय्य होईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले म्हणजे कलियुगातील साक्षात् श्रीविष्णूचाच अवतार ! अवतारांच्या जन्मतिथीनिमित्त त्यांच्या अवतारी तत्त्वाची स्पंदने पृथ्वीतलावर अधिकाधिक प्रमाणात कार्यरत होतात. साधकांनो, हे अवतारी तत्त्व ग्रहण करण्यासाठी शरणागत स्थितीत राहून अंतरामध्ये गुरुदेवांप्रती अपार भाव अनुभवूया आणि या बोधामृताचे वाचन करून जन्मोत्सवाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेऊया !

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘मानवाचा जन्म का झाला ? जन्मापूर्वी तो कुठे होता ? मृत्यूनंतर तो कुठे जातो ? इत्यादी विषयांची थोडीफारही माहिती नसणारे पाश्चात्त्य आणि साम्यवादी मानवजातीचे प्रश्न कधी सोडवू शकतील का ? या सर्व प्रश्नांची उत्तरेच नव्हे, तर त्यांतील अशुभ कसे टाळायचे, हे ज्ञात असलेला एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार आहे !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले