ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

बारसू (राजापूर) तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया चालू !

ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊनच प्रकल्पाची कार्यवाही करण्याचे सूतोवाच !

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी मातीच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘ड्रिलिंग’द्वारे चालू करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यामुळे गेल्या २ दिवसांपासून येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. विरोध करणार्‍या ११० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतल्यानंतरही काही जण आंदोलन करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘ग्रामस्थांनी शांतता राखून प्रशासनाला त्यांचे काम करण्यासाठी सहकार्य करावे. या प्रकल्पाविषयी ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल’, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

एम्. देवेंदर सिंह पुढे म्हणाले की, आंदोलनकर्त्यांचे प्रश्‍न आणि शंका यांचे निरसन करण्यासाठी तज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे. २७ एप्रिल या दिवशी राजापूर येथील प्रांताधिकारी कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सर्व प्रकल्पविरोधी स्थानिक ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाणार आहे. ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊनच प्रकल्पाची कार्यवाही केली जाणार आहे.

कोकणातील बेरोजगारीची समस्या सुटण्याच्या दृष्टीकोनातून प्रकल्पाला पाठिंबाच ! – आमदार राजन साळवी, ठाकरे गट

बारसू प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी ट्वीट करतांना म्हटले आहे की, कोकणातील बेरोजगारीची समस्या सुटण्याच्या दृष्टीकोनातून या प्रकल्पाला माझा पाठिंबाच आहे. प्रकल्पाला विरोध करणार्‍या माझ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू प्रशासनाने पटवून द्यावी, तसेच त्यांच्यावर अन्याय करू नये.

पोलिसी बळावर भूमीपुत्रांचा आवाज दाबून टाकण्याचा सरकारचा डाव ! – खासदार विनायक राऊत, ठाकरे गट

‘चीनच्या सीमेवर नाहीत, इतके पोलीस भूमीपुत्रांचा आवाज दडपण्यासाठी बारसूमध्ये तैनात करण्यात आले आहेत. दमनशाहीने तेलशुद्धीकरण प्रकल्प रेटून नेण्याचे काम शिंदे सरकार करत आहे. वर्ष २०२१ मध्ये उदय सामंत यांनी याच प्रकल्पाला विरोध केला होता. आता तेच यासाठी पुढाकार घेत आहेत’, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी बारसु गावातील ग्रामस्थांच्या घेतलेल्या भेटीच्या वेळी केले.

ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांकडून नोटीस

बारसूमधील वातावरण निवळल्यानंतर येथील सर्वेक्षणाचे काम चालू झाले. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे गटाचे काही पदाधिकारी बारसू येथे जाणार असल्याची माहिती  पोलिसांना मिळाल्यानंतर ‘निवळलेले वातावरण पुन्हा बिघडू शकते’, या कारणास्तव ठाकरे गटाचेे जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी आणि प्रमोद शेरे यांना ही नोटीस देण्यात आली.