प्रादेशिक भाषांतील शाळा बंद पडत आहेत, तर इतर भाषिक शाळांमध्ये सातत्याने वाढ
पणजी, २५ एप्रिल (वार्ता.) – राज्यात वर्ष २०१४ पासून आजपर्यंत १०२ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. वर्ष १९७८ पासून मागील ३५ वर्षांत ३८४ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. शासकीय माहितीनुसार वर्ष २०१४ मध्ये राज्यात ८२२ सरकारी प्राथमिक शाळा होत्या. वर्ष २०१६ मध्ये ही संख्या ८००, २०१७ मध्ये ७८०, वर्ष २०१९ मध्ये ७४२ आणि नंतर कोरोना महामारीच्या काळात पुढील २ वर्षे एकही शाळा बंद पडली नाही. वर्ष २०२२ मध्ये सरकारी प्राथमिक शाळांची संख्या ७१८ वर पोचली. वर्ष २०१४ ते आतापर्यंत मागील ९ वर्षांत १०२ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. यामुळे वर्षाकाठी सरासरी १५ सरकारी शाळा बंद पडत आहेत. वर्ष १९८८ पासून मागील ३५ वर्षे ३८४ सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. एका बाजूने मराठी आणि कोकणी माध्यमांतील शाळांची संख्या प्रतिवर्षी घटत असली, तरी दुसर्या बाजूने इतर भाषिक शाळांची मागणी आणि संख्या वर्षागणिक वाढत आहे. इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे.
आगमी शैक्षणिक वर्षासाठी ५२ नवीन शाळांसाठी अर्ज
गोव्यात कोकणी आणि मराठी या प्रादेशिक भाषांबरोबरच कन्नड, तेलुगु आणि उर्दू भाषांतून प्राथमिक शिक्षण दिले जाते. प्रादेशिक भाषांतील या शाळांना सरकार अनुदान देते. गोव्यात सध्या १ सहस्र १३३ प्राथमिक शाळा आहेत. यामधील ७१८ सरकारी, २८६ अनुदानित आणि १२९ अनुदानाविना चालणार्या शाळा आहेत. मराठी ७५८, इंग्रजी २५१, कोकणी ६७, उर्दू ११, कन्नड ४ आणि हिंदी ३ शाळा चालू आहेत. आगमी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी ५२ नवीन शाळांसाठी अर्ज आलेले आहेत. यामधील २१ अर्ज कोकणी, १० अर्ज मराठी, १४ इंग्रजी, उर्दू ६ आणि हिंदी शाळेसाठी १ अर्ज आलेला आहे. सर्व अर्ज शाळांची शक्याशक्यता तपासण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.