काणकोण, २५ एप्रिल (वार्ता.) – काणकोण येथील मामलेदार कचेरीत २४ एप्रिल या दिवशी रात्री आग लागली आणि यामध्ये बांधकाम योग्य भूमीच्या आणि विल्हेवाट लावलेल्या सुमारे ५० ‘म्यूटेशन’ (भूमीच्या मालकी हक्कात पालट करणे) प्रकरणांची कागदपत्रे अन् जुनी कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही आग फार मोठी नव्हती; मात्र महत्त्वाची आणि जुनी अनेक कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे या घटनेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
(सौजन्य : In Goa 24×7)
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये एक फॅन आणि २ पटल (टेबल) जळाले आहेत, तर काही धारिका अर्धवट जळाल्या आहेत.
SABOTAGE? Fire from Forests enter Goa Govt Offices https://t.co/xHAxgLLWjI
— Goemkarponn (@goemkarponnlive) April 25, 2023
घटनेविषयी माहिती देतांना काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर म्हणाले, ‘‘ही दुर्घटना २५ एप्रिलला पहाटे ४ वाजता घडली. मामलेदार कचेरीत काही कर्मचारी ‘सागर-कवच’ मोहिमेच्या सेवेसाठी आले असतांना त्यांना कार्यालयाचे दार उघडल्यानंतर ‘डाटा ऑपरेटर’ बसत असलेल्या खोलीतून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित अग्नीशमन दलाला कळवले आणि त्वरित तेथून कागदपत्रे हालवली. अग्नीशमन दलाने काही क्षणात आग विझवली.
राज्यात हल्लीच अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. भूमी बळकावल्याची प्रकरणे आणि आग दुर्घटना यांचा काही संबंध आहे का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.