भीक मागणे कोण थांबवणार ?

कार्यालयातून रात्री घरी येतांना लोकल रेल्वेस्थानकाबाहेर एक आजी-आजोबा गृहस्थ मला हातात बॅग घेऊन दिसले आणि त्यांनी अडवून साध्या स्वरातच मला ‘आम्ही गावी जात आहोत; पण जवळ पैसेच नाहीत ?’, असे म्हणत पैसे मागितले. ही पहिली घटना वगळता यासारखे अनुभव मला अनेक ठिकाणी आले. यामध्ये अनेकदा तरुण जोडपेही आढळले. शेवटी मला समजले की, यामागची या लोकांची कारणे भली वेगवेगळी असतील; पण शेवटी भीक मागायची ही नवीनच पद्धत चालू झाली आहे आणि देशासाठी घातक आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

रेल्वेमध्ये छोटीशी मुले झाडू मारतात आणि भीक मागतात, अनेकदा रेल्वे किंवा बस स्थानकावर छोट्याशा मुलांना त्यांची आई आपल्याजवळ झोपवून भीक मागत असते, अनेकदा मुले झोपूनच रहावीत; म्हणून त्यांना अमली पदार्थ देण्याच्याही घटना घडल्या आहेत. अशा आई-वडिलांविषयी काय बोलायचे ? हा प्रश्न पडतो. अजाणत्या मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करणे, हा गुन्हाच आहे; मात्र आता प्रत्येक शहरातील प्रमुख चौकाचौकांत राजरोस भीक मागणारे दिसतात. अनेकदा लहान मुलांना वा भिकार्‍यांना ‘पैशांऐवजी खाऊ देतो’ म्हटले, तर ते चक्क नकार देतात. कोरोना महामारीच्या काळात एका पथकर नाक्यावर भीक मागणारे तृतीयपंथी दिसायचे. नोटांचा बंडल तेच हातातून दाखवत फिरायचे आणि पैसे घ्यायचे. त्यांच्यातील एका तृतीयपंथीयाने सांगितले की, आमची मोठी संघटना आहे, आम्ही सगळीकडे आमचे परिसर वाटून घेतले आहेत. आम्ही कुणीही एकमेकांच्या परिसरात भीक मागायला जात नाही.

हे सर्व पाहिल्यानंतर ‘भीक मागणे, हा व्यवसाय झालेला आहे’, असे वाटल्यास चुकीचे ते काय ? काहीही काम न करता ‘आयते कसे मिळेल’, ही मानसिकता बळावत आहे. लहान मुले किंवा तरुणांमध्ये ही मानसिकता बळावल्यास हे देशासाठी घातक आहे. या दृष्टीने समाजातील एका वर्गाला प्रशिक्षित करणे किंवा प्रसंगी शिक्षा करून यावर उपाय काढणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपूवी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी राज्यातील भिकार्‍यांचा विचार करत त्यांच्या कल्याणासाठी योजना आणली होती. त्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी यावर काम केलेले दिसत नाही. पोलीस, रेल्वे पोलीस, राष्ट्रीय बाल हक्क आयोग आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रित येऊन यावर व्यापकपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे.

– श्री. नीलेश देशमुख, सानपाडा, नवी मुंबई.