आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशात आतंकवाद्यांकडून ६० नागरिकांची हत्या

बुर्किना फासो सैन्य

ओआहिगोया – पश्‍चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशात प्रतिदिन मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारले जात आहे. नुकतेच ६० नागरिकांची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. हत्या करणार्‍या संशयितांनी सैनिकांचा गणवेश परिधान केला होता. यापूर्वी १५ एप्रिल २०२३ या दिवशी संशयित जिहादी आतंकवाद्यांनी ४० जणांची हत्या केली होती.

बुर्किना फासोमध्ये गेल्या वर्षी सैन्याने दोनदा सत्तापालट घडवून आणले होते; मात्र त्यानंतरही देशात हिंसाचार चालूच आहे. या प्रदेशातील अशांतता वर्ष २०१२ मध्ये माली येथून चालू झाली. येथील जिहादी आतंकवाद्यांनी तुआरेग फुटीरतावाद्यांचे अपहरण केले. त्यानंतर शेजारच्या बुर्किना फासो आणि नायजर या देशांमध्ये हा हिंसाचार पसरला. या हिंसाचारात आतापर्यंत सहस्रावधी लोक मारले गेले आहेत, तर २५ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.