कन्नड अभिनेता चेतन कुमार याचा संतापजनक दावा !
बेंगळुरू (कर्नाटक) – अभिनेते चेतन कुमार याने अलीकडेच तिरुपती मंदिराविषयी ‘बुद्ध मंदिर पाडून तेथे तिरुपती मंदिर उभारण्यात आले’, असा दावा केला होता. आता त्याने पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘‘राम ही काल्पनिक व्यक्ती असून रामजन्मभूमी म्हणणे हे अवैज्ञानिक आहे.’’ यापूर्वी चेतन याने ‘हिंदुत्व हे असत्यावर आधारित आहे’, अशी अवमान करणारी पोस्ट केल्यावरून त्याला अटक करण्यात आली होती. (याचाच अर्थ हिंदु धर्माविषयी सातत्याने अशी विधाने करण्याची त्यांना वाईट खोड आहे, हे लक्षात येते ! अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा करणे आवश्यक आहे ! हिंदु धर्मीय सहिष्णु असल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात किंवा निष्क्रीय रहातात ! – संपादक)
चेतन कुमार यांनी मांडलेली सूत्रे
१. ‘रामजन्मभूमीच्याच ठिकाणी राम जन्मला’, असे म्हणणे योग्य नाही. राम, कृष्ण, गणेश ही लोकांची श्रद्धा आहे. त्याच प्रमाणे अल्ला देखील झाला असेल. हे सर्व श्रद्धेमुळे असलेले देव आहेत. मारम्मा, यल्लम्मा या सर्व अवैज्ञानिक आहेत. वैज्ञानिक म्हटले, तर इतिहासात पुरावे पाहिजेत. येशू, महंमद, बुद्ध, आंबेडकर, ज्योतिबा फुले, सम्राट अशोक, अकबर हे सर्व वैज्ञानिक असून इतिहासात जिवंत होते. (परदेशात येशू ख्रिस्त झालाच नाही, असे संशोधन पुढे येत आहे. त्याविषयी चेतन कुमार याने बोलावे ! – संपादक) इतर सर्व श्रद्धेवर रचलेली काल्पनिक पात्रे आहेत. (जे पाहिलेले नाही, ते असत्य आणि जे पाहिले आहे, तेच सत्य, असे मानणारे चेतन यांच्यासारखे बुद्धीप्रमाण्यवादी लोक जगात सहस्रावधी आहेत; मात्र देवतांवर श्रद्धा ठेवणारे अब्जावधी असल्याने अशांना महत्त्व उरत नाही ! – संपादक)
२. ‘रामायण घडले आहे, या विषयी पुरावे आहेत’, या पत्रकाराच्या प्रश्नावर चेतन म्हणाले, ‘तुम्ही सांगत असलेले पुरावे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. कोणत्या चिंतनकेंद्राने ‘हे सत्य आहे’, असे सांगितले आहे का ? कुणी एक तरी त्या कालावधीत, तिथे गेले आहे का ? द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग केव्हा होते ? ते सर्व केवळ काल्पनिक आहे. बुद्धच २ सहस्र ५०० वर्षांपूर्वी झाला. वेदिक काळ, आर्य भारतात आले ३ सहस्र ५०० वर्षांपूर्वी तेव्हापासूनच चातुर्वर्ण्य, हिंदु धर्म आला. त्याचे पुरावे आहेत.’’
३. हिंदु धर्म नाही. ख्रिस्त पूर्व ६ व्या शतकात बाहेरून आलेल्यांनी भौगोलिक रीतीने ‘हिंदुस्थान प्रदेश’ असे म्हटले. हिंदुत्व, हिंदु राष्ट्र हे सावरकरांनी १०० वर्षांपूर्वी केले. (हिंदु हा शब्द धर्मग्रंथांमध्ये आहे, हे यापूर्वीच स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा तर्क मांडत रहाणे आता हास्यास्पद आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|