मृत्‍यूपत्राची टाळाटाळ म्‍हणजे मालमत्तेचा घोळ !

१. ‘मृत्‍यूपत्र’ करून न ठेवलेल्‍या आजी-आजोबांची गोष्‍ट !

‘ही एक अलीकडेच घडलेली सत्‍यकथा आहे. आमच्‍याच कार्यालयात ही दुर्दैवी घटना घडली. एक छोटेखानी कार्यक्रम आमच्‍याच शांतीनगर, फोंडा येथील कार्यालयात आयोजित करण्‍यात आला होता. एका नामांकित संस्‍थेने ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी ‘कायदा’ या विषयावर ‘मृत्‍यूपत्र कसे करावे ?’, या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. त्‍याला ५० वर्षे वयोगटापासून थेट ९५ वर्षांच्‍या सर्व ठणठणीत ज्‍येष्‍ठ नागरिकांची उपस्‍थिती होती. शनिवार असल्‍याने या कार्यक्रमाला बरीचशी गर्दी जमली होती. कार्यक्रम चांगला झाला.

या वेळी ज्‍येष्‍ठांची प्रश्‍नोत्तरे संपता संपेना; परंतु वेळेअभावी कार्यक्रम आटोपता घ्‍यावा लागला. सर्व प्रश्‍नांची व्‍यवस्‍थित आणि समाधानकारक उत्तरे मिळाल्‍यामुळे उपस्‍थित जनसमुदाय आनंदाने स्‍वगृही परतला. या कार्यक्रमामध्‍ये ‘मृत्‍यूपत्राचे कसे अनंत लाभ असतात ?’, याची संपूर्ण लाभदायक माहिती देण्‍यात आली. समारंभाच्‍या प्रारंभीच प्रत्‍येकाने आम्‍हाला स्‍वतःची वैद्यकीय माहिती, आजारपणे, औषध, गोळ्‍या यांचा तपशील दिलेला होता. त्‍यावरील निष्‍कर्षानुसार त्‍यांनी घरातील सर्व कुटुंबियांची खासगी माहितीही दिलेली होती. त्‍यात कोण आवडते ? कोण नावडते ? सुनांमधील धुसफूस, मुलांमधील वाद, सुमधुर संबंध, मुलांनी अंगाशी आणलेले न्‍यायालयीन दावे इत्‍यादी माहिती दिली होती. अनेक आजी-आजोबांनी डोळ्‍यांत पाणी आणून या सर्व गोष्‍टींचा वैयक्‍तिकपणे ऊहापोह केला होता. त्‍यामुळे प्रत्‍येकाला धीर देत समजूतदारपणा दाखवून आम्‍ही ‘मृत्‍यूपत्र आणि मृत्‍यूचा लगेच संबंध लावायचा नसतो’, या गोष्‍टींवर बौद्धिक वर्ग घेतले. ‘प्रत्‍येकाला मृत्‍यूपत्र कसे करायचे ?’, याचे अर्जही वाटले होते आणि सर्वांना त्‍याप्रमाणे आपापली संपत्ती, जागा, घर, दागिने आदींची माहिती नावासह त्‍या त्‍या रकान्‍यात लिहायला सांगितलेले होते. नंतर तो सर्व तपशील त्‍या सर्वांच्‍या कौटुंबिक अधिवक्‍त्‍यांकडे देण्‍यास आणि ‘रजिस्‍टर्ड’ मृत्‍यूपत्र करून घेण्‍यास सांगितले. ‘कुठूनही करा; पण करा’, असा आमचा आग्रह होता.

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी

२. मृत्‍यूपत्र करून न ठेवल्‍याने मालमत्तेसाठी नातेवाइकांची चढाओढ ! 

मृत्‍यूपत्र करण्‍याविषयी एक आजोबा आणि एक आजी यांच्‍यामध्‍ये एकमत होत नव्‍हते. आजी म्‍हणत होत्‍या, ‘‘आपण धडधाकट आहोत, आताच करून टाका. डोळ्‍यांसमोरच नीट वाटणी करूया आणि शांतपणे उर्वरीत आयुष्‍य जगूया.’’ त्‍यांना ‘मृत्‍यूपत्र हे त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतरच कार्यरत होणार आहे. त्‍यामुळे मृत्‍यूची वेळ येईपर्यंत त्‍याच त्‍यांच्‍या संपूर्ण मालमत्तेची मालकीण असणार आहेत. त्‍या वाटेल तेव्‍हा सर्व गोष्‍टींचा उपभोग घेऊ शकतात. सर्व काही विकू शकतात. मुदतठेवी मोडू शकतात आणि परत मृत्‍यूपत्र करू शकतात. मुलामुलींच्‍या वागण्‍यात पालट झाला, तर जे जे लिहून दिलेले होते, ते ते आवश्‍यक पालट त्‍या करणार आणि शेवटपर्यंत करू शकतात’, या सर्व गोष्‍टींचे संपूर्ण आकलन झालेले होते. अर्थात् कार्यशाळेचा हेतू साध्‍य झालेला होता; परंतु आजोबांच्‍या समजूतीमध्‍ये घोळ झाला होता. त्‍यामुळे आजी त्‍यांना सारखी समजावून सांगत होती.

त्‍यांचा असा गोंधळ झालेला की, त्‍यांना मृत्‍यूपत्र हे ‘गिफ्‍ट डीड’ (बक्षीसपत्र) सारखेच वाटत होते. मृत्‍यूपत्र हे माणसाच्‍या मृत्‍यूनंतर बोलायला लागते. नेमून दिलेली मालमत्ता त्‍या व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूनंतर संबंधितांना मिळते. ‘गिफ्‍ट डीड’ हे दोन जिवंत व्‍यक्‍ती एकमेकांना जे काही द्यायचे ते देऊन मालकी हस्‍तांतरित करतात. जिवंत असतांनाच मालकी जाते, ते ‘गिफ्‍ट डीड’ आणि मृत्‍यू येईपर्यंत सर्व मालमत्तेवर स्‍वतःचीच मालकी, म्‍हणजे ‘मृत्‍यूपत्र’ होय. हे त्‍यांना नीट समजत नव्‍हते. ‘मुलांना विचारावे लागेल’, असेही आजोबा सांगायला लागले. पुष्‍कळ प्रयत्नांती त्‍यांना नीट विषय समजला. मृत्‍यूपत्राचे मुलांशी काहीच देणे-घेणे नसते. त्‍यांना काही विचारायचेही नसते. मुलांची कधीच संमती लागत नाही. मृत्‍यूपत्राची नोंद करतांनाही तेथे कुणीच लागत नाही. या गोष्‍टींची कुणाला काहीच माहिती नसते. ही वस्‍तूस्‍थिती आहे. त्‍यामुळे मुलांच्‍या धाकाने लोक ‘मृत्‍यूपत्र’च करत नाहीत. दुर्दैवाने संबंधित आजी-आजोबा दोन मासांच्‍या कालावधीत कालवश झाले. आजीचा ‘ड्राफ्‍ट’ सिद्ध होता. आजोबा ‘आज-उद्या करू’, असा वेळकाढूपणा करत होते; परंतु काळाने त्‍यांच्‍यावर आधीच घाला घातला. आता सर्व मुले, मुली आणि सुना गिधाडासारखे एकमेकांवर तुटून पडलेले आहेत अन् पुढील घोळ निस्‍तरत आहेत.

३. योग्‍य वारसाला मालमत्ता मिळण्‍यासाठी मृत्‍यूपत्र करणे आवश्‍यक !

वेळ कधीच सांगून येणार नाही. ‘आज आता ताबडतोब’ हीच मृत्‍यूपत्राची आवश्‍यकता आहे. ज्‍यांनी केले त्‍यांची मालमत्ता विनासायास सर्व कुटुंबियांना विनामोबदला, विना कटकट आणि कोणत्‍याही व्‍ययाविना मिळाली. ज्‍यांनी केले नाही, त्‍यांचे सर्व नातेवाइक ‘मृतकामुळे आम्‍हाला त्रास सहन करावा लागत आहे’, असा टाहो फोडत आहेत. यात टाळाटाळ अशी अंगाशी येते.’

– अधिवक्‍ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा. (२०.४.२०२३)