गोवा : अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या २ प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ

पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारल्याचा गोवा पोलिसांचा दावा असला, तरी गोवा पोलिसांनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या २ प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. अखेर पहिल्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मध्यस्थीनंतर, तर दुसर्‍या प्रकरणात गुन्हा पीडित साहाय्यता केंद्र (व्ही.ए.यु.) आणि बाल कल्याण समिती (सी.डब्ल्यु.सी.) यांच्या मध्यस्थीनंतर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.

पहिल्या घटनेत अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी ४ वेळा बलात्कार केला आणि तिला अनेक वेळा गर्भपातही करावे लागले. (यातून धर्मशिक्षणाअभावी नीतीमत्ता विसरलेला समाज किती अधःपतनाला गेला आहे, ते दिसून येते ! – संपादक) पीडित मुलीने ही घटना सांगितल्यानंतर शाळेच्या समुपदेशकाने पीडित मुलीला महिला पोलीस ठाण्यात नेले. यानंतर पीडित मुलगी आगशी पोलीस ठाण्यात गेली आणि त्यानंतर गुन्हा पीडित साहायता केंद्र अन् बाल कल्याण समिती यांचे साहाय्य घेण्यात आले. त्यानंतर जुने गोवे पोलीस ठाण्याने या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट केला. दुसर्‍या घटनेमध्ये अल्पवयीन पीडित आणि संशयित हे दोघेही मित्र होते. संशयिताकडे पीडितेची नग्न छायाचित्रे होती. संशयिताने छायाचित्रे नष्ट करण्याची हमी देऊन तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी प्रारंभी या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यास नकार दर्शवला; मात्र वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतरच या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झाला.

संपादकीय भूमिका

अशा पोलिसांना केवळ बडतर्फच करणे नव्हे, तर कारागृहात टाकले पाहिजे !