उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला प्रारंभ !

उत्तराखंडमधील  चारधाम

ऋषिकेश (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील  चारधाम यात्रेला २२ एप्रिल, म्हणजेच अक्षय्य तृतीयेपासून प्रारंभ झाला. २१ एप्रिलपर्यंत यात्रेसाठी १६ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. गंगोत्री धामचे दरवाजे दुपारी १२.३५ वाजता, तर यमुनोत्री धामचे दरवाजे दुपारी १२.४१ वाजता उघडण्यात आले. केदारनाथ धामचे दरवाजे २५ एप्रिल, तर बद्रीनाथ धामचे दरवाजे २७ एप्रिल या दिवशी उघडले जातील.

उत्तराखंड शासनाने मोजक्याच संख्येने यात्रेकरूंना भेट देण्यावरील बंदी उठवली आहे. भाविकांची ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी चालू रहाणार आहे.

प्रत्येक भाविकाचा सुरक्षित प्रवास, हे राज्यशासनाचे दायित्व ! – मुख्यमंत्री धामी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

भाजपशासित उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, २१ एप्रिलला ऋषिकेश येथून चारधाम यात्रेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आहे. प्रत्येक भाविकाचा सुरक्षित प्रवास, हे राज्यशासनाचे दायित्व आहे. आम्ही भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. भारत आणि परदेशातून येणार्‍या प्रत्येक भाविकाचा प्रवास सुरक्षित असेल अन् प्रत्येकाला यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल, याकडे सरकार लक्ष देईल.