आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी नसलेला ‘नोंदणी विवाह’
‘नोंदणी विवाह’ ही पद्धत वर्ष १८७२ मध्ये इंग्रजांच्या राजवटीत निर्माण झाली. या माध्यमातून मिळणार्या करातून शासकीय उत्पन्न वाढवणे, हा ब्रिटिशांचा मुख्य उद्देश होता. भारतात आजही ही पद्धत पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाच्या सवयीतून किंवा काटकसर म्हणून पाळली जाते. या विवाहात कोणताही विधी न करता, तसेच मुहूर्त इत्यादी न पहाता कागदोपत्री विवाह केला जातो. हिंदु धर्मानुसार मनुष्याचा जन्म ईश्वरप्राप्तीकरता आहे. गर्भधारणा ते विवाहापर्यंतच्या काळात जीवनात घडणार्या प्रमुख सोळा प्रसंगी केलेल्या धार्मिक संस्कारांमुळे मनुष्य ईश्वराच्या अधिक जवळ जातो, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. धार्मिक पद्धतीने विवाह केलेल्या अनेकांना याविषयी अनुभूतीही आल्या आहेत. नोंदणी विवाहात कोणतेही धार्मिक विधी होत नसल्यामुळे वधूवरांवर धर्मसंस्कार होत नाहीत. त्यामुळे अशा विवाहाला नैर्बंधिक (कायदेशीर) मान्यता जरी मिळाली, तरी हा विवाह आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ठरत नाही. यास्तव अल्प व्ययासाठी (खर्चासाठी) नोंदणी विवाहाचा धर्मविरोधी पर्याय न निवडता अत्यंत साध्या पद्धतीने; मात्र सर्व धार्मिक विधींसह विवाह करणे अधिक श्रेयस्कर आहे.’
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘विवाहसंस्कार : शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’)