‘धार्मिक पद्धतीने विवाह करतांना त्यात अनेक विधी केले जातात. प्रत्येक विधीमुळे वधू-वरांचे स्थूलदेह (शरीर) आणि सूक्ष्म देह (मन, बुद्धी अन् अहं) यांची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे वधू-वरांचे वासनेपेक्षा मनाच्या स्तरावर आणि आध्यात्मिक पातळी (टीप १) ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास आध्यात्मिक स्तरावर मीलन होण्यास साहाय्य होते. इतर पंथांत अशा प्रकारे सात्त्विकता वाढण्यासाठी कोणतेही विधी केले जात नाहीत. त्यामुळे तशा प्रकारे विवाह झालेल्या जिवांचे मीलन बहुतांश वेळा केवळ शारीरिक स्तरावरच होते. विवाहासारखा रज-तमात्मक प्रसंगही सात्त्विक करून त्याला अध्यात्माची जोड देऊन देवतांचे कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची संधी हिंदु धर्माने दिली आहे.
(टीप १ – प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण असतात. व्यक्तीने साधना, म्हणजे ईश्वर-प्राप्तीसाठी प्रयत्न आरंभ केल्यावर तिच्यामधील रज-तम गुणांचे प्रमाण घटू लागते आणि सत्त्वगुणाचे प्रमाण वाढू लागते. सत्त्वगुणाच्या प्रमाणावर आध्यात्मिक पातळी अवलंबून असते. सत्त्वगुणाचे प्रमाण जितके अधिक, तितकी आध्यात्मिक पातळी अधिक असते. सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते, तर मोक्षाला गेलेल्या व्यक्तीची पातळी १०० टक्के असते. – संकलक)
(संदर्भ – सनातन निर्मित ग्रंथ – विवाह संस्कार)