सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजच्या पिढीला समुपदेशकाची आवश्यकता निर्माण झाली आहे. योग्य ज्ञान आणि संस्कार मिळत नसल्याने पुन्हा संयुक्त कुटुंब पद्धतीकडे वळले पाहिजे. भारताने जगाला वसुधैव कुटुम्बकम् । (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) चा आदर्श दिला असून ‘जी २०’ देशांच्या माध्यमातून संयुक्त कुटुंब पद्धतीचा प्रसार चालू केला आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तालुक्यातील डोंगरपाल येथे केले.
डिंगणे-डोंगरपाल येथील श्री स्वामी समर्थ मठात आयोजित कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. त्यानंतर अवधुतानंद महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर मठाचे संस्थापक अवधुतानंद महाराज, माजी सभापती प्रमोद कामत, बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, डिंगणे गावचे माजी सरपंच जयेश सावंत, न्हावेली सरपंच कालिदास गावस आदी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले,
‘‘कीर्तन हा ईश्वरी भक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी ईश्वरी साधना आणि भक्ती करणे, ही काळाची आवश्यकता आहे. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान देण्याचे कार्य कीर्तनकार करत असतात. कीर्तन महोत्सवाची कला लुप्त होण्याच्या मार्गावर असतांना युवा पिढी ही कला आणि संस्कृती जोपासण्यासाठी कार्यरत आहे, हे कौतुकास्पद आहे. ज्ञानदान हे केवळ शाळेतच नाही, तर मठ, मंदिरे यांतूनही होते, हे आपण दाखवून दिले आहे. लोकांचा अध्यात्म आणि धार्मिक संस्कृती यांकडे कल वाढवण्यासाठीच गोवा शासनाने ‘मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा’ गोव्यात चालू केली आहे. या यात्रेला देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे.’’