विवाहविधीद्वारे वधू-वरांसह उपस्थितांची आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, हे पाहूया.
१. विवाहमंडपात व्यासपिठावर सर्वांना दिसतील, अशा पद्धतीने श्री गणेश, कुलदेवता, उपास्यदेवता आणि गुरुप्राप्ती झाली असल्यास गुरु यांचे चित्र/छायाचित्रे लावून त्यांची पूजा करावी. ही जागा फुलांनी सजवून तिथे अखंड दीपप्रज्ज्वलन करावे.
२. वर-वधू, तसेच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांपैकी पुरुषांनी धोतर/पायजमा-सदरा आणि महिलांनी सहावारी / नऊवारी साडी नेसावी.
३. विवाहस्थळी ध्वनीक्षेपकावर सनईवादनाची ध्वनी-चकती (ऑडीओ सीडी) लावावी. शक्य असल्यास संतांनी रचलेल्या किंवा गायलेल्या भजनांची ध्वनी-चकती लावावी.
४. विवाहविधीसाठी आलेल्या सर्वांना कुंकवाचा टिळा लावावा.
५. विवाह लवकर उरकण्यासाठी त्यातील विधी वगळू नका किंवा त्यासाठी पुरोहितांच्या मागे तगादा लावू नका. त्यांना ते धर्मशास्त्रानुसार परिपूर्ण करण्यास सांगा.
६. गाण्यांच्या चालीवर रचलेली किंवा विडंबन करणारी मंगलाष्टके म्हणू नयेत.
७. वधू-वरांना शुभेच्छा देतांना सर्वांनी पादत्राणे काढावीत.
८. वधू-वरांना शुभेच्छा देतांना किंवा पाहुण्यांचे स्वागत करतांना हस्तांदोलन (शेकहँड) न करता हात जोडून नमस्कार करावा.
९. विधी चालू असतांना त्यांचा अर्थ आणि महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्याविषयी पुरोहितांना सांगावे अन्यथा आपण सांगावे.
१०. कोणत्याही धार्मिक कार्याच्या वेळी गोंगाट करणे अयोग्य आहे; म्हणून विधी चालू असतांना गोंगाट होणार नाही, याविषयी कुटुंबीय, नातेवाईक आदी सर्वांनीच दक्षता घ्यावी.
११. अती तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ वा पाव, कृत्रिम शीतपेये यांसारखे तामसिक पदार्थ भोजनात ठेवू नयेत. यापेक्षा वरण-भात-तूप, कोशिंबीर, लाडू यांसारखे सात्त्विक पदार्थ भोजनात ठेवावेत.
१२. अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने अन्नपदार्थ ताटात टाकावे लागतील, एवढे वाढू नयेत किंवा वाढून घेऊ नयेत.
(संदर्भ : ‘सनातन संस्था’ संकेतस्थळ)
पाश्चात्त्य प्रथा दर्शवणारी स्वरूची-भोजन (बुफे) पद्धत नव्हे, तर पारंपरिक भारतीय पद्धत असावी.
मंगलाष्टकांच्या वेळी वधू-वरांवर अक्षता टाकू नयेत. वधू-वरांनी एकमेकांना पुष्पमाळ घालून झाल्यावर त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या मस्तकांवर अक्षता वहाव्यात.
अक्षता दुरून टाकल्यामुळे होणारे तोटे
१. विवाहाच्या वेळी वधू-वरांवर दुरूनच अक्षता टाकण्यात येतात. त्या अक्षता वधू-वरांच्या मस्तकावर न पडल्यामुळे त्यांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वधू-वरांना लाभ होत नाही.
२. देवतांच्या तत्त्वांनी भारित असलेल्या अक्षता उपस्थितांच्या पायाखाली तुडवल्या जातात. त्यामुळे त्यांतील देवतांच्या तत्त्वांचा अवमान होतो.’
– सौ. प्रियांका सुयश गाडगीळ, डोंबिवली
विधी चालू असतांना वर/वधू यांना उचलणे, वर-वधू यांना एकमेकांच्या अंगावर ढकलणे असे अपप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
माळ घालतांना वधू-वरांना वर उचलल्यामुळे होणारे दुष्परिणाम
काही ठिकाणी विवाहाच्या वेळी हार घालतांना वराला सहज हार घालता न यावा आणि त्याची गंमत व्हावी; म्हणून वधूला उचलून उंच करण्यात येते. कधी कधी वरालाही उचलून उंच करण्यात येते. या अयोग्य कृतीमुळे मुहूर्तही टळू शकतो अन् विवाहस्थळी आकृष्ट होणार्या देवतांच्या स्पंदनांना अडथळा निर्माण होतो, तसेच या कृतीमुळे तमोगुणी स्पंदनांचे वातावरणात प्रक्षेपण होते. याचा लाभ घेऊन वायूमंडलातील वाईट शक्ती विवाहस्थळी त्रासदायक शक्तीच्या स्पंदनांचे प्रक्षेपण करतात. त्याचा परिणाम वर आणि वधू यांच्यावरही होऊ शकतो.’
– सौ. प्रियांका सुयश गाडगीळ, डोंबिवली