(म्हणे) ‘बौद्ध मंदिर तोडून तिरुपती मंदिराची निर्मिती झाली आहे !’ – कर्नाटकातील अभिनेते चेतन

कर्नाटकातील अभिनेते चेतन यांचा ‘शोध’ !

कर्नाटकातील अभिनेते चेतन

बेंगळुरू (कर्नाटक) – बौद्ध मंदिर तोडून तेथे तिरुपती देवस्थान बांधण्यात आले आहे, असे विधान कर्नाटकातील अभिनेते चेतन यांनी यू ट्यूबवरील एका मुलाखातीत केले. या विधानावरून हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अभिनेते चेतन यांनी म्हटले की,

१. ‘तिरुपती हे मूलतः बौद्ध मंदिर होते’, असे के. जमुनादास यांनी ‘तिरुपती बालाजी मूलतः बौद्ध मंदिर’ (१४ एप्रिल २००१) या त्यांच्या पुस्तकात विधान केले आहे. इतिहासकार म्हणतात की, वेदिक संस्कृतीची देवालये कधीच नव्हती. ती बौद्धांकडून कह्यात घेण्यात आली. (खोटे बोला; पण रेटून बोला अशा वृत्तीचे अभिनेते चेतन !  – संपादक)

२. कर्नाटकाला भाजपचे हिंदुत्व नाही, तर पेरियार आणि डॉ. आंबेडकर यांच्या सिद्धांतांची आवश्यकता आहे. (कुणाला कोणत्या सिद्धांतांची आवश्यकता आहे, हे समाज ठरवील. हे चेतन यांनी ठरवू नये ! – संपादक) तसेच काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) आणि आम आदमी पार्टी यांचे राजकीय हिंदुत्वही नको आहे. देशातील कोणताच पक्ष परिवर्तनाचा सिद्धांत सांगत नाही.

३. लोकशाहीत सत्य सांगण्याचा अधिकार आहे. मला जाणवलेले सत्य मी सांगू शकतो. मी पुराव्यासह बोलत आहे. तुमच्याकडे पुरावे असतील, तर द्या. राम नावाची व्यक्ती  होती, येथे जन्माला आली होती, हे सिद्ध करा. (अशा प्रकारचे आव्हान अन्य धर्मियांना देण्याचे धाडस अभिनेते चेतन देऊ शकतील का ? – संपादक)

४. खरे सांगायचे, तर ही देवस्थाने पूर्वी बौद्ध विहारच होती. वैदिक काळ म्हणजे ख्रिस्तपूर्व १ सहस्र ५०० ते ख्रिस्तपूर्व ५०० च्या मधला काळ. त्यानंतर बुद्ध येतात. वैदिक काळात होम-हवन, यज्ञ सर्व होते; परंतु देवस्थाने, मंदिरे नव्हती. बुद्धानंतर, अशोक झाल्यानंतर बौद्ध धर्म पसरल्यानंतर बौद्ध स्तुप आणि विहार आले. त्यानंतर पुन्हा ब्राह्मण, वैदिक परंपरा आल्यावर ८४ सहस्र बौद्ध विहार फोडून त्यांचे हिंदु मंदिरांत रूपांतर करण्यात आले. बुद्ध भिक्षुकांना ठार मारून बुद्ध विहारांना वेदिक मंदिरे बनवण्यात आली, असे म्हणतात. तोपर्यंत देवस्थाने नव्हती; कारण वेदिक परंपरेत होम-हवन असते. याला पुरावे आहेत. त्याच्यासाठी पाहिजे तेथे पुरावे देतो. (अशा प्रकारची हास्यस्पद विधाने करून त्यांचे पुरावे देणार्‍यांनी बौद्ध धर्म भारतातून संपुष्टात का आला, याचा आधी विचार करावा ! – संपादक)

५. प्रामुख्याने तिरुपती, केदारनाथ देवस्थाने अशाच रीतीने बांधली आहेत. तिरुपती देवस्थान आधी बौद्ध मंदिर होते. ऐतिहासिक पुरावे सांगतात की, ८४ सहस्र बुद्ध विहार आहेत. ते सर्व राजा अशोक आणि त्याच्या नंतर असलेल्यांनी बांधले.

संपादकीय भूमिका

  • या शोधासाठी चेतन यांना पुरस्कारच द्यायला हवा !
  • साम्यवाद्यांनी लिहिलेल्या खोट्या इतिहासाचे वाचन करून भ्रमित झालेले अभिनेते चेतन ! हिंदु राजांना ‘आक्रमणकर्ते’ रंगवून हिंदूंचा गौरवशाली इतिहास नाकारणारे चेतन यांना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करावा !