राज्‍यातील अन्‍य भाषिक, तसेच केंद्रीय शाळांमध्‍ये होणार मराठीचे मूल्‍यांकन !

मुंबई, १९ एप्रिल (वार्ता.) – राज्‍यातील सर्व अन्‍य भाषिक शाळा, तसेच केंद्रीय माध्‍यमिक शिक्षण मंडळ (आय्.सी.बी.एस्.ई.), भारतीय माध्‍यमिक शिक्षण मंडळ (आय्.सी.एस्.ई.), आंतरराष्‍ट्रीय शिक्षण मंडळ (आय्.बी.) यांसह केंब्रीज अन् अन्‍य मंडळाच्‍या शाळामध्‍ये मराठी भाषेचे मूल्‍यांकन करण्‍याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे. या सर्व शाळांमध्‍ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या श्रेणीनुसार हे मूल्‍यांकन केले जाणार आहे. १९ एप्रिल या दिवशी याविषयीचा शासन आदेश राज्‍यशासनाकडून काढण्‍यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून वरील सर्व शाळांमध्‍ये मराठी भाषेचे अध्‍यापन आणि अध्‍ययन सक्‍तीचे करण्‍यात आले आहे; मात्र या शाळांतील विद्यार्थ्‍यांना मराठी भाषा नवीन असल्‍यामुळे मराठी भाषा आकलन करण्‍यास अडचणी येत असल्‍याचे आढळून आले आहे. त्‍यामुळे या प्रक्रियेचा अभ्‍यास करण्‍यासाठी या शाळांमध्‍ये मराठीचे मूल्‍यांकन करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील ३ वर्षे वरील शाळांतील ८ वी, ९ वी आणि १० वी च्‍या इयत्तांमधील विद्यार्थ्‍यांचे मूल्‍यांकन केले जाणार आहे. यामुळे या शाळांतील विद्यार्थ्‍यांना मराठी भाषा कितपत आकलन होत आहे, याचा अभ्‍यास करता येणार आहे.