खलिस्‍तानवाद संपवा !

जाबच्‍या अमृतसरमध्‍ये असलेल्‍या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात दर्शन घेण्‍यासाठी गेलेल्‍या एका तरुणीने चेहर्‍यावर राष्‍ट्रध्‍वज रंगवल्‍याने मंदिराबाहेरील अधिकार्‍याने तिला रोखले. ‘हा पंजाब असतांना तुम्‍ही भारताचा राष्‍ट्रध्‍वज कसा रंगवू शकता ?’, असा प्रश्‍न अधिकार्‍याने विचारला. अधिकार्‍याने विचारलेल्‍या प्रश्‍नामुळे त्‍याची खलिस्‍तानी मानसिकता यातून दिसून येते. तो अधिकारी पंजाबला भारतापासून वेगळे समजत असून त्‍याला भारतीय राष्‍ट्रध्‍वजाविषयी काही देणेघेणे वाटत नाही. यावरून खलिस्‍तानी मानसिकता पंजाबमध्‍ये तळागाळापर्यंत पोचली आहे, हे आपल्‍याला दिसून येते.

सध्‍या केवळ भारतातच नव्‍हे, तर ऑस्‍ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटन येथेही खलिस्‍तानी चळवळींनी जोर पकडला आहे. पूर्वी कॅनडा हा खलिस्‍तानी चळवळींचा विदेशातील केंद्रबिंदू होता; मात्र आता ऑस्‍ट्रेलियातही त्‍यांच्‍या कारवाया वाढल्‍या आहेत. हे भयावह आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या हत्‍येनंतर खलिस्‍तानी चळवळीचा नायनाट करण्‍यात आला; मात्र सुप्‍तावस्‍थेत तो काही जणांच्‍या मनात खदखदत होता. त्‍याला भारतविघातक शक्‍तींनी फुंकर मारल्‍याने मागील १० वर्षांत या चळवळीने भारत, तसेच विदेशांतही जोर पकडला आहे. या चळवळीमुळे पंजाबमधील हिंदु जनता भयभीत आहे. काहींनी पंजाबमधून पलायन करण्‍यास आरंभ केला आहे. यावरून समस्‍येची दाहकता आपल्‍या लक्षात येते. असे असतांनाही ही चळवळ समूळ नष्‍ट करण्‍यासाठी केंद्र सरकारने म्‍हणावी तशी आश्‍वासक पावले उचलली नाहीत. खलिस्‍तानी चळवळ नष्‍ट करण्‍यासाठी आता पावले उचलणार नाही, तर कधी उचलणार ? पंजाबमध्‍ये काही ठिकाणी खलिस्‍तानवाद्यांना अटक केल्‍यावर त्‍यांच्‍या चौकशीत ‘आम्‍ही हिंदुत्‍वनिष्‍ठांना लक्ष्य करणार होतो’, अशी माहिती पुढे आली आहे. यात भाजपच्‍या नेत्‍यांचाही समावेश होता. या खलिस्‍तानवाद्यांना पाकच्‍या आय.एस्.आय.ची साथ आहे. त्‍यामुळे संपर्कयंत्रणा किंवा शस्‍त्रास्‍त्रे यांच्‍या संदर्भात ते सुसज्‍ज आहेत. त्‍यातच या खलिस्‍तानवाद्यांना सामान्‍य जनतेचाही पाठिंबा आहे. हा पाठिंबा जसा वाढत जाईल, तशा त्‍यांच्‍या कारवायाही वाढत जातील. काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद फोफावला; कारण तेथील धर्मांध जनता ही आतंकवाद्यांच्‍या पाठीशी होती. पंजाबमध्‍ये काश्‍मीरप्रमाणेच परिस्‍थिती निर्माण होत आहे. असे झाल्‍यास तेथील परिस्‍थितीवर नियंत्रण मिळवणे सरकारला कठीण जाईल. अशी टोकाची स्‍थिती निर्माण होऊ नये; म्‍हणून केंद्र सरकारने सतर्क रहावे लागेल. त्‍यातच पंजाबमध्‍ये सत्तेवर असलेल्‍या आपचे खलिस्‍तानवाद्यांशी साटेलोटे आहे, अशी माहिती पुढे येत आहे. या माहितीचा खरे-खोटेपणा येणार्‍या काळात समोर येईलच; मात्र पंजाबचा लचका तोडण्‍यासाठी हपापलेल्‍या खलिस्‍तानवाद्यांवर आताच जरब बसवली नाही, तर येणार्‍या काळात पाकिस्‍तानसह वेगळा पंजाब बघण्‍याची नामुष्‍की भारतियांवर ओढवेल !