तापमानात प्रचंड वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचे जनतेला आवाहन
रत्नागिरी – सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये. स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे, अशी विविध लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
उष्माघात होवू नये; म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना ‘गॉगल्स’, छत्री किंवा टोपी, बूट वा चप्पलचा वापर करावा, प्रवास करतांना पाण्याची बाटली नेहमी समवेत ठेवावी.
उन्हाळ्यात त्रास होवू लागल्यास तात्काळ जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. उष्णतेचा त्रास होणार्या रुग्णांसाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून देण्यात येणार्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांकरता जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा सदैव सज्ज आहे. नागरिकांनी काळजी करू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.