मुंबई, १७ एप्रिल (वार्ता.) – ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे; मात्र घोषणेला १ मास होऊनही शासन आदेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत वाढीव निधीची तरतूद उपलब्ध झालेली नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ९ मार्च या दिवशी विधीमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्यात आली असल्याची घोषणा केली. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या योजनेतील निधी व्यय न होणारे २९६ रोग वगळून त्याऐवजी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील रोगांचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती; मात्र अधिकृत शासन आदेशाअभावी राज्यात अद्याप याची कार्यवाही चालू झालेली नाही.