व्यक्तीची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये तिच्या स्त्री किंवा पुरुष असण्यावर अवलंबून नसणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत
श्रीलंका येथे आयोजित द एट्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमेन्स स्टडीज (The 8 th World Conference on Womens Studies (WCWS २०२२)) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्राप्त संशोधन !

सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

श्री. रूपेश रेडकर

साधना करणार्‍या व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असल्यामुळे; म्हणजे त्यांच्या केवळ लिंगभिन्नतेमुळे आध्यात्मिक स्तरावर त्यांच्यात भेद असतो का ?, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २६ आणि २७ एप्रिल २०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक त्रास या घटकांचा विचार करून १२ स्त्रिया (साधिका) आणि १२ पुरुष (साधक) अशा एकूण २४ जणांना निवडले होते. एका गटात ३ जण अशा प्रकारे स्त्रियांचे ४ गट आणि पुरुषांचे ४ गट, असे एकूण ८ गट बनवून यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणे

२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

सारणीतील निरीक्षणांतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

अ. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अल्प असलेले आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे या अंतर्गत येणार्‍या गट १ आणि गट २ यांची तुलना केल्यास स्त्रियांची सरासरी नकारात्मक ऊर्जा पुरुषांपेक्षा अल्प, तसेच स्त्रियांची सरासरी सकारात्मक ऊर्जा पुरुषांपेक्षा अधिक आहे.

आ. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक असलेले आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे या अंतर्गत येणार्‍या गट ३ आणि गट ४ यांची तुलना केल्यास स्त्रिया आणि पुरुष यांची सरासरी नकारात्मक ऊर्जा यात विशेष अंतर नाही, तर पुरुषांची सरासरी सकारात्मक ऊर्जा स्त्रियांपेक्षा थोडी अधिक आहे.

इ. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अल्प असलेले आणि आध्यात्मिक त्रास नसणारे या अंतर्गत येणार्‍या गट ५ आणि गट ६ यांची तुलना केल्यास स्त्रियांची सरासरी नकारात्मक ऊर्जा पुरुषांपेक्षा अल्प, तसेच स्त्रियांची सरासरी सकारात्मक ऊर्जा पुरुषांपेक्षा अधिक आहे.

ई. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक असलेले आणि आध्यात्मिक त्रास नसणारे या अंतर्गत येणार्‍या गट ७ आणि गट ८ यांची तुलना केल्यास स्त्रियांची सरासरी नकारात्मक ऊर्जा पुरुषांपेक्षा थोडी अधिक, तर पुरुषांची सरासरी सकारात्मक ऊर्जा स्त्रियांपेक्षा थोडी अधिक आहे.

उ. गट १ ते ८ या सर्वच गटांतील घटकांची निरीक्षणे पाहिल्यास केवळ लिंगभिन्नतेमुळे स्त्री आणि पुरुष यांच्यातील नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जांच्या प्रमाणांत भिन्नता आहे, असे दिसून येत नाही.

३. व्यक्तींच्या केवळ लिंगभिन्नतेमुळे आध्यात्मिक स्तरावर भेद नसणे

साधना करणार्‍या व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असल्यामुळे; म्हणजे त्यांच्या केवळ लिंगभिन्नतेमुळे आध्यात्मिक स्तरावर त्यांच्यात भेद नसतो. व्यक्तींची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक त्रास यांमुळे त्यांच्यात आध्यात्मिक स्तरावरील भिन्नता आढळून येते. हेच या चाचणीत दिसून आले.

व्यक्तीने तळमळीने आणि सातत्याने योग्य साधना केली की, तिचा आध्यात्मिक त्रास घटतो अन् आध्यात्मिक पातळी जलद वाढते, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष !

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२.४.२०२३)

ई-मेल : mav.research२०१४@gmail.com

आध्यात्मिक उन्नतीशी निगडित लिंगाच्या आधारे भेदभावाला आव्हान हा शोधनिबंध श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर !

श्री. शॉन क्लार्क

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. शॉन क्लार्क यांनी आध्यात्मिक उन्नतीशी निगडित लिंगाच्या आधारे भेदभावाला आव्हान, हा शोधनिबंध १४ मे २०२२ या दिवशी श्रीलंका येथे आयोजित द एट्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमेन्स स्टडीज (The ८th World Conference on Womens Studies (WCWS २०२२)) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर केला. या परिषदेचे आयोजन द इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट यांनी केले होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. या शोधनिबंधाला परिषदेत उत्कृष्ट सादरीकरण पुरस्काराने गौरवण्यात आले.