पुणे – येथील महापालिकेमध्ये वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणार्या १३२ कनिष्ठ अभियंत्यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले. त्यामध्ये स्थापत्य पदावरील १०९, विद्युत् पदावरील १७ आणि यांत्रिकी पदावरील ६ अभियंत्यांचा समावेश आहे. आता अधीक्षक, तसेच लेखनिक यांचेही स्थानांतर करण्यात येणार असल्याचे समजते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी याविषयी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांना निवेदन दिले आणि त्वरित स्थानांतर प्रक्रिया राबवण्याची विनंती केली होती. महापालिकेतील स्थानांतर धोरणाला हरताळ फासून स्थानांतरांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे, असा आरोपही या राजकीय नेत्यांनी केला होता. (असे असेल, तर प्रशासनाने याविषयी नेमकी भूमिका स्पष्ट करावी, तसेच लाखो रुपयांचा होणारा कारभाही जनतेला कळायला हवा. – संपादक)
महापालिकेतील वर्ग १ ते ३ मधील कोणत्याही अधिकार्याचे ३ वर्षांनंतर संबंधित विभागातून स्थानांतर केले जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून असे स्थानांतर झालेले नाही. ६ वर्षे होऊनही त्यांचे स्थानांतर झालेे नव्हते. सर्व अभियंत्यांना स्थानांतराची ऑर्डर तातडीने दिली गेली, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली. (ठरलेल्या नियमानुसार स्थानांतर का झाले नाही ? – संपादक)