किनारपट्टीवरील अवैध कृत्ये थांबवा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे पोलीस महासंचालकांना आदेश

मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, १३ एप्रिल (वार्ता.) – किनारपट्टीवर अवैध कृत्ये करणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांना दिले आहेत. कळंगुट आणि कांदोळी किनारपट्टीवरील दलाल, फिरते विक्रेते आदींच्या विरोधातील कारवाईवरून पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि स्थानिक आमदार मायकल लोबो, तसेच पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्यामध्ये गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस महासंचालकांना हा आदेश दिला आहे.

कळंगुट आणि कांदोळी किनारपट्टीवरील अनधिकृत कृत्यांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यटकांसाठी दलाल, फिरते विक्रेते, भिकारी आदी उपद्रवी ठरत आहेत. मध्यंतरी कळंगुट परिसरात हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे प्रकरणही बहुचर्चित झाले होते. कळंगुट आणि कांदोळी भागांत सायंकाळी ७ वाजल्यानंतर महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाल्याचे विधान पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी हल्लीच केले आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेविषयीही त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘देश-विदेशांतून लोक गोव्यात येऊन किनारपट्टी भागांत व्यवसाय करत आहेत आणि यामुळे या भागांत देखरेख ठेवणे अत्यावश्यक ठरते. पर्यटकांना उपद्रवकारक ठरलेले दलाल, फिरते विक्रेते, भिकारी आदींच्या विरोधात आता कडक मोहीम चालू केली जाणार आहे.’’

संपादकीय भूमिका

असे आदेश पोलिसांना का द्यावे लागतात ? अवैध कृत्ये रोखणे हे पोलिसांचे कर्तव्य नाही का ?