अयोध्येतील श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर ७७ कोटी रुपयांचा व्यय (खर्च) करणार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक राम कुमार विश्‍वकर्मा यांनी श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराच्या सुरक्षेविषयी माहिती देतांना सांगितले की, मंदिराच्या सुरक्षेसाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर ७७ कोटी रुपये व्यय (खर्च) करण्यात येणार आहे. मंदिर पूर्ण झाल्यानंतर भाविकांची गर्दी ५ पटींनी वाढेल. त्यामुळे स्वयंचलित ‘शॉटगन’, ‘बुलेटप्रूफ जॅकेट’, टेहळणी उपकरणे, शरयू नदीत तैनात करण्यात येणार्‍या चिलखती नौका आदी उपकरणे खरेदी करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी अयोध्येत अनेक टेहाळणी मोनरे (वॉच टॉवर) बांधले जातील.

मंदिराच्या दरवाजाच्या परिसरात टेहळणीसाठी तोंडवळा ओळखणार्‍या ‘फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण मंदिरात ८०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. आकाशातून ड्रोनद्वारे २४ घंटे लक्ष ठेवण्यात येणार आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा) वापर करण्यात येणार आहे.