स्वयंपूर्ण गोवा अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीचा कृतीआराखडा ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सर्व सचिवांसमवेत बैठक

प्रत्येक मासात पहिल्या सोमवारी होणार आढावा बैठक

पणजी – स्वयंपूर्ण गोवाच्या अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीसाठी कृतीआराखडा सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी १० एप्रिलला राज्यातील विविध खात्यांच्या सर्व सचिवांसमवेत बैठक घेतली. अर्थसंकल्पात दिलेल्या योजना आणि कार्यक्रम मासिक आधारावर राबवण्यासाठी सचिवांना प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले,

‘‘अर्थसंकल्पातील प्रावधाने समयमर्यादेत कार्यवाहीत आणण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. अर्थसंकल्पाच्या काटेकोर कार्यवाहीचा निर्णय घेऊन आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टीने पुढे जाऊन नवीन सुधारणा कशा करायच्या ? आणि अंदाजपत्रकात घोषित केलेल्या योजना कोणत्या मासापासून चालू होणार ? याचा तपशील देण्याच्या सूचना सचिवांना दिल्या आहेत. नवीन प्रकल्पांची पायाभरणी कधी करायची ? आणि प्रकल्पांचे उद्घाटन केव्हा होणार ? याचेही वेळापत्रक निश्चित करण्याचे अन् नियम बनवण्याविषयी सूचित करून समयमर्यादाही दिली आहे. मासाच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी आढावा बैठक होणार आहे.

वर्ष २०२२ मध्ये आम्ही महसुलात ३० टक्के वाढ मिळवली. महसूल विभागात आम्ही ६०० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले असतांना प्रत्यक्षात ९०० कोटी रुपये मिळाले. वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटीचे) लक्ष्य ८०० कोटी रुपये होते, तर आम्हाला १ सहस्र कोटी रुपये मिळाले. या वर्षी आम्ही महसुलाच्या उद्दिष्टांमध्ये २० ते ३५ टक्के वाढीचे लक्ष्य ठेवले आहे, तसेच सार्वजनिक बांधकामाच्या महसुलात ४० कोटी रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अल्प कर्ज घेण्याचे नियोजन केले आहे.’’