अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा करणारे पुरो(अधो)गामी !

डावीकडून जितेंद्र आव्हाड, उमेश खाडे, राज मुंगासे

‘महाराष्ट्रातील शिवसेनेच्या शिंदे सरकारच्या विरोधात ‘रॅप’ गीत (निष्क्रीय सरकारच्या विरोधात बनवलेले गीत) बनवणार्‍या २ तरुणांना पोलिसांनी कह्यात घेतले. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चिडून ट्वीट केले. त्यात त्यांनी ‘व्यथा व्यक्त करणार्‍या तरुणांवर अन्याय्य कारवाई केली जात आहे. स्वतःची व्यथा व्यक्त करण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य या तरुणांना नाही का ?’, अशा स्वरूपात सरकारवर टीका केली आहे. जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदींच्या अनुयायांवर कारवाई करण्यात येते, त्या वेळी त्यांच्या नेत्यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य आठवते. ज्या वेळी अभिनेत्री केतकी चितळे यांच्यासारखे व्यक्त होतात, त्या वेळी त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाकारून त्यांना महिनोनमहिने कारागृहात डांबण्यात येते.

श्री. धैवत वाघमारे

पुरोगामित्वाचा बुरखा पांघरणार्‍यांवर जेव्हा टीका केली जाते, तेव्हा तो गुन्हा ठरतो आणि जेव्हा हिंदुत्वनिष्ठांवर टीका केली जाते, तेव्हा तो विद्रोह किंवा अभिव्यक्तीस्वातंत्र्य ठरते. असे सतत रंग पालटणारे राजकारणी, पुरोगामी, बुद्धीवादी इत्यादींना जनता ओळखून आहे. जनता मतपेटीतून त्यांची त्यांना जागा दाखवून देत आहे; परंतु पुरोगाम्यांच्या डोळ्यांवर झापडे असल्याने त्यांच्या हे लक्षात येत नाही. सत्य कितीही लपवून ठेवले, तरी ते उघड होतेच आणि त्याचा प्रकाश संपूर्ण विश्वाचे अज्ञान दूर करतो. त्यामुळे राजकारणी, पुरोगामी, बुद्धीवादी अशांना इतिहास त्यांची जागा त्यांना दाखवून देईलच. त्या वेळी अशांचे हाल कुणीही विचारणार नाही, हे निश्चित !’

– श्री. धैवत विलास वाघमारे, रामनाथी, गोवा (९.४.२०२३)