राजकीय दुकान बंद होण्याच्या भीतीने काहींचा हिंदुत्वाला विरोध ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा !

  • रामललाचे दर्शन 

  • भव्य गंगाआरती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – आमच्या अयोध्या दौर्‍याचा काहींना त्रास झाला; कारण त्यांना हिंदुत्वाची ‘अ‍ॅलर्जी’ आहे. हे लोक हिंदु धर्माविषयी चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटते की, हिंदुत्व सर्वांच्या घरात आणि मनात पोचले, तर त्यांची राजकीय दुकाने बंद होतील. या भीतीमुळे हे लोक हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांना विरोध करत आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ एप्रिल या दिवशी अयोध्या येथे प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना केले. ‘प्रभु श्रीराम यांच्या आशीर्वादामुळेच आम्हाला ‘धनुष्य-बाण’ पक्षचिन्ह आणि ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव मिळाले’, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. या दौर्‍यात मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘मी येथे अनेकदा आलो आहे; परंतु या वेळी येथे वेगळेच वलय जाणवले. राममंदिर हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.’’

संत-महंतांचा आशीर्वाद

८ आणि ९ एप्रिल हे दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोद्धा दौर्‍यावर होते. ९ एप्रिल या दिवशी त्यांनी राममंदिराच्या बांधकामाची पहाणी केली. त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही होते. दोघांनी रामलला आणि हनुमान गढी यांचे दर्शन घेऊन आरती केली. यानंतर शिंदे यांना शिवसेनेचे चिन्ह असलेला धनुष्यबाण, गदा, तसेच प्रभु श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या एकत्रीत मूर्ती संत-महंतांच्या शुभहस्ते भेट देण्यात आली. अयोध्येतील विविध आखाड्यांचे संत-महंत या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या सर्वांचा त्यांना आशीर्वाद लाभला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शरयू नदीची आरती  

रात्री शरयु तिरावर आरतीचा अतिशय भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी २ दिवसांपूर्वीच येथे आलेले ठाणे, मुंबई, नाशिक आणि अन्य ठिकाणांहून आलेले शिवसेनेचे ५ सहस्रांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून योगी आदित्यनाथ यांचे कौतुक !

मुख्यमंत्र्यांचे उत्तर भारतीय रामभक्त आणि योगी शासनातील मंत्री यांनी केलेल्या अत्यंत भव्य स्वागताने मुख्यमंत्री भारावून गेले होते. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेल्या भाषणात योगी शासनाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘येथील रस्ते मोठे झाले आहेत. गुन्हेगारी अल्प झाली आहे. ‘बुलडोझर बाबां’नी हे केले आहे.’’

मी रामभक्त म्हणून येथे आलो आहे ! – एकनाथ शिंदे

येथील एका कार्यक्रमात ‘मी इथे मुख्यमंत्री म्हणून आलो नाही. मी रामभक्त म्हणून येथे आलो आहे.’ असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगिल्यावर रामभक्तांनी श्रीरामाचा गजर केला. या वेळी भव्य रॅली काढण्यात आली होती. त्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. लक्ष्मण किल्ल्यावर जातांना मुख्यमंत्र्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांनी हेलिकॉप्टरमधून अयोद्धेतील दृश्य टिपली.

या दौर्‍याच्या वेळी ‘शेतकरी दुःखी असतांना अयोध्येला गेल्या’च्या शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले नाही. त्यांनी नुसत्या घोषणा केल्या आणि आम्ही पूर्तता केली आहे.

अयोध्येत भव्यदिव्य महाराष्ट्र भवन उभारणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई – शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्यदिव्य राममंदिर उभारण्याचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद मोदी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. अयोध्येत भव्यदिव्य महाराष्ट्र भवन उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अयोध्या येथे प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर ९ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी वरील आवाहन केले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंह हेही उपस्थित होते.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘अयोध्या येथील संपूर्ण वातावरण भगवेमय आणि राममय झाले आहे. आज राममंदिराच्या उभारणीचे काम पाहिले. सगळ्यांना वाटायचे राममंदिर कसे बांधणार ? लोक म्हणायचे ‘मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नही बताएंगे’; परंतु पंतप्रधान मोदी यांनी हे करून दाखवले.’’