भोस्ते (खेड) येथे विक्री केलेला तांदूळ प्लास्टिकचा नाही

तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी पहाणी केल्यानंतर वस्तूस्थिती स्पष्ट !

रत्नागिरी – खेड तालुक्यातील भोस्ते येथील रास्त धान्य दुकानातून वितरित करण्यात आलेल्या तांदुळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी संबंधित रास्त धान्य दुकानात जाऊन तेथील तांदुळाच्या नमुन्यांची पहाणी केली असता ते तांदूळ प्लास्टिकचे नसल्याचे स्पष्ट झाले.

खेड तालुक्यातील निळीक गावाला भोस्ते येथील रास्त धान्य दुकानातून धान्य वितरित होते. हनुमान जयंतीच्या भंडार्‍यानिमित्त निळीक येथील हनुमान मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी गावातील १० शिधापत्रिकाधारकांनी भोस्ते येथील रास्त धान्य दुकानातून तांदूळ घेतला होता आणि हाच तांदूळ मंदिराच्या महाप्रसादासाठी त्यांनी दिला होता. या महाप्रसादाची सिद्धता करत असतांना गावातील काही महिला हा तांदूळ निवडत आणि पाखडत असतांना त्यांना या तांदुळामध्ये अल्प प्रमाणात पांढर्‍या रंगाचे तांदुळाचे वेगळे दाणे आढळून आले होते. यातील काही दाणे फुगीर आणि चमकदार असे आढळून आले होते. त्यामुळे काही लोकांच्या मनात त्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता आणि संबंधितांनी याविषयी तक्रारही केली होती. (जरी हा तांदुळ प्लास्टिकचा नसला, तरीही वितरित झालेला तांदुळ वेगळा असल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थांना संभ्रम होणे, हे चुकीचे नाही ! संभ्रम न पडणारा तांदुळ वितरित होण्याची व्यवस्था खरे तर प्रशासनाने प्रारंभीच करायला हवी ! – संपादक)

 तांदुळाविषयी शिधापत्रकांची कोणतीही हरकत नाही ! –  जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत

तहसीलदार घोरपडे यांनी पुरवठा निरीक्षक आणि महसूल साहाय्यक यांच्यासह संबंधित रास्त धान्य दुकानात पहाणी केल्यानंतर तो तांदूळ प्लास्टिकचा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येथील शिधापत्रिकाधारकांनी आता त्यांची कुठलीच हरकत वा तक्रार नसल्याचे लिहून दिले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी दिली.