धार्मिक कि निधर्मी वाद ? आणि त्यावरील उपाययोजना

हिंदु धर्मभावनेच्या विरुद्ध एकत्रितपणे चाललेल्या वादळात पृथ्वीवर आजही हिंदु धर्माचे अस्तित्व अबाधित आहे हाच मोठा चमत्कार !

‘स्वातंत्र्योत्तर भारत देशामध्ये आपण आजपर्यंत अनुभवत आहोत ते दोन विचार प्रवाह किंवा मनप्रवाह ! धार्मिक बंधने पाळणार्‍यांचा सन्मान करणारे आणि धार्मिक बंधनांना न मानणारे अन् त्यांना विरोध करणारे ! ज्यांना आपण सरसकट ‘निधर्मी’ असे संबोधित करत आलो आहोत. कुठला मतप्रवाह चांगला आणि कुठला अयोग्य ? यावर आजपर्यंत नेहमी वादविवाद अन् दंगली-भांडणे झालेली आहेत. त्याची गणना करणे केवळ अशक्य आहे. प्रतिदिनच्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा ही वादाची सूत्रे आम्हा प्रत्येकाला सतावत असतात. आयुष्यातील आनंद उपभोगण्यास कुठली विचारसरणी योग्य वा अयोग्य आहे ? या गोंधळातून प्रत्येकाला वाटचाल करावी लागत असते.

श्री. महेश पारकर

१. निधर्मीवाद्यांनी देशाची स्थिती ‘आणखी कितीतरी तुकडे होऊ शकतील’, अशी करणे !

देशाच्या स्वातंत्र्यापासून गेल्या ७५ वर्षांत किंबहुना त्या आधीपासून म्हणजे साधारणतः म. गांधींच्या जीवनकालापासून ही धार्मिक-निधर्मीपणाची भांडणे या देशांतील जनतेने अनुभवली आहेत. स्वातंत्र्यानंतर तर या देशाला निधर्मीपणाच्या विचारसरणीखाली आणायचे अतोनात प्रयत्न झाले. आपल्या शासनव्यवस्थेने ही व्यवस्था देशाच्या तळागाळापर्यंत नेण्याचे एक प्रकारे बलपूर्वक प्रयत्न केले. याविरुद्ध आपल्या संस्कृतीरक्षकांनी विशेषतः धार्मिक पायाचा आधार घेणार्‍या धर्मरक्षकांनी दंड थोपटले. एक प्रकारे हा असा झगडा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आपण अनुभवलेला आहे. धार्मिक बंधनांना विरोध करत निधर्मी विचारसरणी राबवायचे ध्येय बाळगणारे आपले नेते आणि तशी विचारप्रणाली असणारे आपले शासक या त्यांच्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती किंवा परिणाम म्हणूया, आपल्या वाट्यास काय आले ? तर खंडप्राय आपल्या देशाचे कित्येक तुकडे झालेले वास्तव आम्हा भारतियांना भेट म्हणून लाभले. धार्मिक-निधर्मीपणाच्या इतका प्रचंड काळ चाललेल्या लढाईमुळे आपल्या नेत्यांनी स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारायचे पाप केलेले आहे, तरीसुद्धा त्याच जुन्या निधर्मीपणाच्या विचारप्रणालीच्या अनुयायांनी हा देश सलग ६० वर्षे चालवला. त्याचा परिणाम खंडित झालेल्या भारत देशाचे आणखी कितीतरी तुकडे होऊ शकतात, अशी गंभीर अवस्था याच लोकांनी करून ठेवली.

२. निधर्मीवाद्यांच्या राज्यप्रणालीचे परिणाम २० वर्षांनंतर न्यून होण्याची शक्यता !

देशाला एकत्र बांधून ठेवू शकणार्‍या हिंदु विचारप्रणालीच्या अतूट धाग्याचा आम्हाला विसर पडला. किंबहुना तत्कालीन सरकारने तो विसर पाडण्यास सर्वाधिक प्रयत्न केलेले दिसतात. एक प्रकारे जनतेस हतबल आणि निष्क्रीय करून ठेवलेले चित्र देशात दिसत आहे. वर्ष २०१४ पासून धार्मिक बंधने आणि सांस्कृतिक पाया यांचा आधार घेत शासन चालवणारे शासक देशाला लाभले असले, तरीही गेल्या ६० हून अधिक वर्षांपासून चाललेली राज्यपद्धत त्या तत्त्वप्रणालीचे बरे-वाईट परिणाम आणि संस्कार इतक्या लवकर पुसले जाणार आहेत का ? आणखी २० ते ३० वर्षांच्या कालखंडानंतर कदाचित् सगळे वातावरण स्वच्छ होईल. त्यापूर्वी तशी आशा बाळगणे सर्वार्थाने भाबडेपणाच ठरू शकते.

३. निधर्मीपणाचा हिंदूंच्या मानसिकतेवर झालेला गंभीर परिणाम !

देशाच्या स्वातंत्र्याच्या आधीच्या आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये ‘निधर्मी राजवटीला देशात नेमकी कोणती विचारसरणी राबवायची आहे ? नेमके काय साध्य करायचे आहे ?’, याचा सामान्य जनतेला उलगडाच होत नव्हता. तशा पद्धतीचा आग्रह करण्यामागे त्यांचा हिंसक कारवाया घडवून आणण्याकडेही रोख असायचा. हिंदु धर्मामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा त्यांचा निश्चय ते बोलून दाखवत असले, तरी तो तसा कधीच जाणवला नाही आणि कधी प्रत्यक्ष वाटला नाही. उलट सहस्रो वर्षे हिंदु जनमानसाला जगायला उत्तेजित करत आलेल्या हिंदु धर्म भावनेलाच नष्ट करण्यासाठी उभारल्या जाणार्‍या त्या कारवाया वाटत गेल्या. सदासर्वकाळ निधर्मीपणाचा जप करत ही शासनपद्धत चालली. आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या कलमांचा अर्थ त्यांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे लावत सर्वधर्मसमभाव जनतेच्या माथी मारला. मनुष्य तत्त्वाशी बांधील असणार्‍या राज्यघटनेच्या कलमांच्या संबंधाचा खुलासा तर त्यांनी कधीच केला नाही. या अशा प्रकारच्या लपवाछपवीचे गंभीर परिणाम म्हणजे धड हिंदु धर्मभावना नको किंवा जर ती मानलीच, तर ती ‘तळ्यात ना मळ्यात’ अशा प्रकारे वरपांगी ! त्यामुळे ‘ना धड हिंदु धर्मभावनेच्या बाजूने,  ना धड त्या विरुद्ध’, अशी मानसिकता या लोकांनी सर्वसामान्य जनतेची करून ठेवलेली आजही दिसत आहे. अशा हिंदु व्यक्तींच्या मानसिकतेचे गंभीर परिणाम आज त्यांच्या सामाजिक जीवनातील प्रत्येक कृतीत ठळकपणे दिसून येतात.

४. डाव्या विचारसरणीचे पत्रकार आणि विद्वान मंडळी हिंदूंमध्ये धर्मभावना जागृत करण्यात अडसर !

ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मप्रसारकांनी हिंदूंच्या या मानसिकतेचा प्रमाणाबाहेर लाभ उठवला. त्यांनी आमच्या (हिंदूंच्या) मनातील उरलीसुरली भावना संपवून टाकली. त्यावर त्यांनी ‘आमचीच धर्मभावना कित्येक पटींनी श्रेष्ठ आहे’, हा समज देशभर पसरवून धर्मांतराचा अतिरेक चालू केला. आज आपली समाजरचना पाश्चात्त्य विचारसरणीकडे वेगाने चाललेली दिसते. त्यामागची प्रमुख कारण ‘टीव्ही, भ्रमणभाष यांचा प्रमाणाबाहेर होत असलेला वापर’, असे आपण सर्रास म्हणत असतो; परंतु गेल्या ६० वर्षांच्या कालखंडामध्ये धार्मिक-निधर्मीपणाच्या कलहाचा आपल्या मनामध्ये जो गोंधळ झाला आहे, ते यामागचे प्रमुख कारण आहे, असे वाटते. एक प्रकारे आपल्या हिंदु धर्मभावनेच्या अस्तित्वावरच प्रभाव टाकणारी ही पाश्चात्त्यीकरणाची स्थिती आहे. तिचा पूर्णपणे निचरा करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हिंदु धर्मभावना प्रकर्षाने पुन्हा जागृत करणे, हाच उपाय दिसतो; परंतु देशात आज या क्षणी जे डाव्या विचारसरणीचे पत्रकार आणि विद्वान मंडळी नांदत आहेत, तीच या कामी प्रमुख अडसर ठरू शकते; कारण कित्येक दशकांच्या या मंडळींचा आपल्या मनावरील प्रभाव सहजासहजी न्यून होणार नाही.

५. कथित बुद्धीवादी आणि निधर्मीवादी यांनी सर्वसामान्यांना दिशाहीन अन् संस्कृतीहीन करणे !

देश आणि राज्य या पातळ्यांवरील पत्रकार, तसेच प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रांतील अनेक विद्वान मंडळी डाव्या विचारसरणीच्या सूचीमध्ये उल्लेखित करण्याजोगी आहेत. आजही भोवताली तशी मंडळी सामान्य नागरिकसुद्धा दाखवू शकतो. गोव्यासारख्या छोट्या राज्यात आपण ती सूची पूर्ण करू शकतो, अशी परिस्थिती आहे. निधर्मीपणाच्या स्वप्नरंजनात ही जमात आजही मग्न आहे. स्वतःच्या लेखणीच्या आधारे मिळालेल्या प्रतिष्ठेच्या जोरावर इतरांना स्वतःप्रमाणे बनण्यास याचना करणारी ही जमात ! नेहमी समाजात वास्तव्य करूनही स्वत:ला वेगळी समजणारी, समाजसुधारणेचा मक्ता मिरवणारी ही जमात ! स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या गोड गैरसमजामुळे एक प्रकारे मातलेली ही जमात ! पूर्ण समाजाने आपल्या मागे डोळे बंद करून चालावे, अशी अपेक्षा बाळगणारी ही जमात !

नेहमी सर्वसामान्यांना दिशाहीन, संस्कृतीहीनतेच्या दिशेने वाटचाल करायला शिकवत आलेली आहे. कथित बुद्धीवादी, तसेच श्रेष्ठत्वाचा आव आणणारी ही जमात परिस्थितीप्रमाणे फिरवाफिरवी करण्यात कुशल आहे. तसेच त्याच चलाखीने राजकीय लाभ उपटत असते. तात्पर्य, या जमातीने सर्वसामान्यांना केवळ स्वप्नेच दाखवली आहेत.

६. हिंदु धर्मावरील श्रद्धा निर्मूलन करणे, हे अंनिस आणि निधर्मीवादी यांचे ध्येय !

शाम मानव यांच्यासारखी माणसे या निधर्मी, डाव्या विचारसरणीचा अवलंब करणारी म्हणून त्यांचे नेमकेपणाने उदाहरण देता येईल. ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे तथाकथित कार्य करत आलेले आहेत; परंतु केवळ हिंदु धर्मातील अंधश्रद्धांवर त्यांनी नामनिर्देश केला. केवळ हिंदु धर्मातील श्रद्धा-अंधश्रद्धांवर ते स्वतःचा रोख ठेवत आल्यामुळे हिंदु धर्मावरील जनतेच्या मनातील श्रद्धा, भावना संपवण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण करण्यात त्यांची उभी हयात गेली. धार्मिक विरुद्ध निधर्मी अशी लढाई देशभर, तर श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा या चाललेल्या लढाईत सर्व निधर्मीवादी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासमवेत ! अशा प्रकारे सश्रद्ध हिंदूंच्या मनातील श्रद्धा संपवण्याच्या कामी सरकारच्या पाठिंब्याने चालणारी यंत्रणा गेली ६० वर्षे या देशात अग्रेसर आहे. देशाच्या एकूण मानसिकतेवर दूरगामी परिणाम करणारे चित्रपट, दूरचित्रवाणीवरील मालिका, काही अपवाद वगळता प्रसारमाध्यमे हीसुद्धा शासनाच्याच ‘ओ’ला ‘ओ’ देत काम करणारी ! असे हे कार्य थोडीथोडकी नव्हे, तर अनुमाने ६० वर्षे एकाच दिशेने कार्य करण्याचा हा उपक्रम राबवत आहेत. यामुळे सश्रद्ध हिंदूंची अवस्था किती बिकट झाली आहे ? याचे नेमके चित्र देशभर दिसत आहे. हिंदु धर्मभावनेच्या विरुद्ध एकत्रितपणे चाललेल्या या वादळात पृथ्वीवर आजही हिंदु धर्माचे अस्तित्व अबाधित आहे, हाच मोठा चमत्कार आहे.

७. श्रद्धा अथवा अंधश्रद्धा यांमधील कोणती वाट चोखाळावी ?

श्रद्धा कधी अंधश्रद्धा बनते ? जेव्हा कुठल्याही कर्मकांडाचा अतिरेक होतो तेव्हा; परंतु प्रत्येक व्यक्तीच्या मनातील श्रद्धेमागे कुठले ना कुठले कारण असतेच. देवाची किंवा कुठल्या तरी अदृश्य शक्तीची भीतीही असू शकते. माणूस या दृष्टीने दुसर्‍या माणसासमवेतच्या सहवर्तनाच्या चांगल्या उद्दिष्टाला हा एक प्रकारे नैतिक आधार असू शकतो. हा आधार देवाचा; बुवा, महाराज किंवा समाजातील चांगल्या प्रामाणिक वर्तनाच्या व्यक्ती यांचासुद्धा असू शकतो. हा आधार घेणे किंवा न घेणे, तो मान्य करणे अथवा न करणे, हे सर्वस्वी व्यक्तीच्या मनाच्या ठेवणीचा भाग असतो किंवा वैयक्तिक आयुष्याच्या हालचालींना प्रेरक ठरणार्‍या कुठल्याही गोष्टीचा असू शकतो.

अशा प्रेरक गोष्टींना, मानसिक आधार देणार्‍या गोष्टींना आज सर्रासपणे ‘अंधश्रद्धा’ या उपहासात्मक शब्दांत उल्लेख करण्याची ‘फॅशन’ झाली आहे. जर श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धेचा तिढा अशाच प्रकारे चालत राहिला, तर सामान्य मनुष्य कुठल्या आधारावर आयुष्य जगणार ? कुठलीही गोष्ट श्रद्धेने केली, तर त्याचे लाभ हे निश्चित असतात. तशीच प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू अंधश्रद्धेचीही असू शकते. इथे देव मान्य करणे अथवा न करणे, हा संदर्भ घेऊया. त्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलनवाले जी जनतेच्या मनावर बळजोरी करतात, ती कुठपर्यंत मान्य करायची ? किंवा ती अजिबात करू नये ? हे सूत्र पुढे व्यक्तीने आयुष्य जगणे किंवा न जगणे अशा प्रकारे स्वतःचे अस्तित्व मान्य करणे अथवा न करणे इतपत येऊन ठेपते. श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा यामध्ये चाललेले हे युद्ध किती ताणून धरायचे ? कि या दोहोंमध्ये जी मधली वाट आहे, ती आपण अंगीकारायची ?

८. वास्तव आणि वैचारिक आयुष्य यांचा मेळ घालायला शिकवणारी सनातन संस्था !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सनातन संस्थेच्या कार्यप्रणालीच्या रूपात हा पर्याय आपल्यासाठी ठेवलेलाच आहे. ही कार्यपद्धत स्वआयुष्य योग्य प्रकारे पुढे नेण्यास आधार ठरते, हा अनुभव आजपर्यंत आम्ही सहस्रो साधकांनी घेतलेला आहे. अशी ही जीवनपद्धत जी स्वतःच्या आत्म्याला योग्य संस्कारांच्या आधारे घडवते, तीच वाट योग्य आहे. हे सनातन संस्थेच्या साधनेच्या पायावर आधारित जीवनशैलीने सिद्ध केले आहे. शेवटी वास्तव आणि वैचारिक आयुष्यविषयक कल्पना यांचा सुमेळ घालू न शकणार्‍या बुद्धीवादी, निधर्मी म्हणून मिरवणार्‍या जमातीमागे जायचे ? कि तो मेळ साधायला शिकवणार्‍या सनातनच्या साधनेवर आधारित जीवनशैलीचा स्वीकार करणे योग्य ? या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या अनुभवाने शोधणे, यातच धार्मिक कि निधर्मी व्हायचे ? या प्रश्नाचे योग्य उत्तर सापडू शकते.

– श्री. महेश पारकर, कोंकणी आणि मराठी साहित्यिक, शिरोडा, गोवा. (१७.३.२०२३)