‘कृपा मजवर केली देऊन संधी विशेषांक सेवेची ।
व्यष्टी अन् समष्टी सेवेतून वाट दाविता व्यापकतेची ।।
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चे ४ विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले. कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी असूनही ‘साधकांना गुरुदर्शन व्हावे’, यासाठी हे विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले. या विशेषांकाची सेवा करतांना साधकांनी श्री गुरूंची अनुभवलेली कृपा आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘नारदांप्रमाणे संपूर्ण जगामध्ये श्रीमन्नारायणाची स्तुती करण्यासाठीच आपल्या सर्व साधकांचा जन्म आहे’, हे प्रत्येक साधकाने लक्षात ठेवले पाहिजे’, असे ईरोड (तमिळनाडू) येथे १७.१०.२०१६ या दिवशी झालेल्या सप्तर्षी नाडीवाचन क्रमांक १०२ मध्ये महर्षि सांगितले आहे. ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या आम्हा साधकांचे हे भाग्य आहे की, आमची सेवा गुरुदेवांची महती जगभर पोचवण्याची आहे. त्यामुळे ‘जन्मोत्सव विशेषांकांची सेवा करण्याची संधी आम्हा साधकांना मिळाली’, हे आमचे भाग्यच आहे !
१. जन्मोत्सव विशेषांकांच्या सेवेची संधी मिळणे
विशेषांकांची सेवा चालू करण्यापूर्वी माझ्या आईचे शस्त्रकर्म झाले होते. त्यामुळे आईला काही कृती करता येत नव्हत्या; म्हणून मी तिच्या सेवेसाठी घरी थांबले होते; परंतु ‘महर्षींच्या आज्ञेने आपण परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्तचे दैनिकाचे विशेषांक १ मास आधी प्रकाशित करणार आहोत’, असे समजले. दीड मासानंतर चालू करण्याची जन्मोत्सव विशेषांकाची सेवा अवघ्या १५ दिवसांवर आली. त्यामुळे आईच्या शस्त्रकर्मानंतर काही दिवसांतच मी सेवेसाठी आश्रमात येणे चालू केले.
२. ‘विशेषांक साधकांना चैतन्य देणारे व्हायला हवेत’, असे वाटून आनंदाने सेवा होणे
‘आपत्काळ जवळ आल्यामुळे दैनिकाचे हे विशेषांक साधकांना पुढे कायम संग्रही ठेवता आले पाहिजेत’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे या ऐतिहासिक अंकांची सेवा करण्याची संधी देवाने दिली; म्हणून मला सतत कृतज्ञता वाटत होती. ‘हे विशेषांक परिपूर्ण, श्री गुरूंना अपेक्षित आणि साधकांना बळ अन् चैतन्य देणारे व्हायला हवेत’, असे मला वाटू लागले अन् सेवा करतांना आनंद मिळू लागला.
३. विशेषांकांच्या सेवेतून ‘परिस्थिती स्वीकारणे आणि वर्तमानात रहाणे’, या गोष्टी शिकायला मिळणे
३ अ. सेवेचे पूर्वनियोजन चांगले करूनही संतांनी ‘सेवेत पुष्कळ चुका आहेत’, असा निरोप पाठवणे आणि पूर्ण केलेली सेवा रहित करून पुन्हा नव्याने सेवा चालू करावी लागणे : सेवा चांगली होण्यासाठी यापूर्वी विशेषांक करतांना नियोजनाच्या स्तरावर ज्या काही चुका झाल्या होत्या, त्या लक्षात घेऊन सर्व साधकांनी सेवेचे पूर्वनियोजन चांगले केले. आधी झालेल्या चुका टाळण्यासाठी सर्व जण सतर्क राहू लागले; परंतु देवाला प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी वेगळेच शिकवायचे असते. देव पुढचे पुढचे शिकवत असतो. या वेळी नियोजन चांगले केले; पण त्यावरच अल्पसंतुष्ट न रहाता देवाने आम्हाला परिस्थिती स्वीकारून वर्तमानात आनंदी रहायला शिकवले.
विशेषांकाची झालेली सेवा संतांना दाखवली. तेव्हा त्यांनी ‘सेवेत पुष्कळ चुका आहेत’, असा निरोप पाठवला आणि त्या चुका फलकावर लिहून प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. विशेषांकासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतांना पूर्ण केलेली सेवा रहित करून आम्हाला पुन्हा नव्याने सेवा चालू करावी लागली. असे दोनदा झाले; परंतु ‘हा विशेषांक परिपूर्ण व्हावा’, अशी आमच्यापेक्षा देवाचीच तळमळ अधिक होती; म्हणून देव शेवटच्या क्षणापर्यंत सुधारणा सांगत होता आणि त्या सुधारणा करण्यासाठी आम्हाला शक्तीही पुरवत होता.
३ आ. सेवेत अनेक चुका होऊनही निराशा न येता सकारात्मक राहून प्रयत्न करता येणे : संतांनी सेवेत अनेक पालट सांगितले. सेवेत चुका झाल्या, तसेच वेळही अल्प होता; पण ईश्वराने आम्हा साधकांना निराशा येऊ दिली नाही. कुणाच्याही मनात ‘असे का झाले ? आता एवढ्या अल्प वेळेत हे जमणार नाही’, असे नकारात्मक विचार आले नाहीत. ‘ज्या चुका झाल्या, त्यांतून शिकून आता पुढील सेवा तरी गुरूंना अपेक्षित अशी करूया’, असे आम्हाला वाटत होते. ‘कितीही पालट झाले, तरी चालतील; पण ही सेवा श्री गुरूंना अपेक्षित अशीच झाली पाहिजे’, असाच ध्यास सर्वांना होता. त्यामुळे आम्ही सकारात्मक राहून प्रयत्न करत होतो. गुरूंचे तत्त्व इतक्या प्रमाणात कार्यरत होते की, ‘त्यांनी ही सर्व सेवा कशी करून घेतली ?’, हे कळलेच नाही.
४. साधकांनी संघटितपणे सेवा केल्याने आनंद अनुभवायला मिळणे
पूर्वी काही वेळा सेवा करतांना साधकांचे एकमत झाले नाही, तर अडचणी यायच्या. काही वेळा मनमोकळेपणाच्या अभावामुळे प्रसंग मनातच रहायचे आणि त्यामुळे सेवा करतांना मनावर ताण असायचा; पण या वेळी सर्वांनी संघटितपणे सेवा केली. त्यामुळे सेवा करतांना आनंद अनुभवायला मिळाला.
५. आध्यात्मिक स्तरावर उपाययोजना करणे
विशेषांकाची छपाई चांगली होण्यासाठी आणि सेवेत येणारे अडथळे दूर होण्यासाठी आम्ही ‘प्रार्थना करणे, प्रत्येक अर्ध्या घंट्याने जयघोष करणे’, असे केले. त्यामुळे ‘देव आपल्या समवेत आहे’, असे आम्हाला वाटायचे.
६. कलेच्या संदर्भात सेवा करणार्या साधिकांचे साहाय्य लाभणे
ऐन वेळी सेवेत पालट होत असल्यामुळे आम्हाला अल्प वेळेत अनेक गोष्टी आणि बारकावे शिकायला मिळाले, तसेच स्वतःतील कर्तेपणाची जाणीव झाली. कलेच्या संदर्भात सेवा करणार्या साधिकांनीही रात्री जागून सेवेत साहाय्य केले. ‘विशेषांकात प्रसिद्ध होणारी छायाचित्रे पाहून वाचकांचा भाव जागृत झाला पाहिजे’, असे त्यांना वाटत होते.
७. विशेषांक प्रसिद्ध झाल्यानंतर तो पहातांना साधकांनी अनुभवलेला आनंद !
अशा प्रकारे विशेषांक छपाईला गेला. दुसर्या दिवशी सकाळी मी अल्पाहारासाठी भोजनकक्षात आले. तेव्हा दिसलेले चित्र पाहून माझ्या अंगावर रोमांच आले. सामान्यतः वर्तमानपत्राच्या कक्षावर (स्टॉलवर) कसे चित्र असते ? वृत्तपत्र विक्रेतेही लांबूनच पेपर टाकून जातात. ‘सनातन प्रभात’च्या संदर्भात मात्र आम्हाला नेहमीच वेगळा अनुभव येतो. साधक ‘सनातन प्रभात’चा अंक आदराने हातात घेतात. जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकांच्या मुखपृष्ठावर सनातनचे ३ गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची छायाचित्रे होती. ‘या अंकाविषयी साधकांचा भाव कसा होता ?’, हे पुढील प्रसंगांतून लक्षात येते.
अ. समोर एक साधक बसले होते. त्यांनी विशेषांक हातात घेतला आणि तो स्वतःच्या कपाळाला लावला. मुखपृष्ठावरील गुरुदेवांचे छायाचित्र पाहून त्यांच्या चेहर्यावरील भाव पालटले. साक्षात् गुरुदेव समोर असल्याप्रमाणे त्यांनी त्या अंकाला वंदन केले आणि ते पुन्हा गुरुदेवांचे चित्र न्याहाळू लागले.
आ. त्यानंतर दुसरी एक साधिका आली. तिने अंक पाहिला. तिच्या चेहर्यावर मोठे हास्य आले. तिने अंक अनाहतचक्राला (हृदयाशी) लावला आणि डोळे मिटले.
अशा प्रकारे विशेषांकावरील गुरुदेवांचे छायाचित्र पाहून आणि आतील लेख वाचून साधकांना होणारा आनंद मी पाहिला आणि मला वाटले, ‘जर गुरुदेवांना साधकांना असा आनंद द्यायचा असेल, तर त्यासाठी मला सेवेत कितीही पालट / सुधारणा कराव्या लागल्या, तरी चालतील. आपण ते करूया.’ माझी पात्रता नसतांना देवाने मला दिलेली ही संधी आहे. ‘त्या संधीचे सोने करण्यात मी न्यून पडले; म्हणून देवाला त्यामध्ये सुधारणा सांगाव्या लागल्या’, हा भाव मनात ठेवून मी पुढील सेवा केली.
८. सेवेतून सकारात्मकता वाढणे आणि ‘गुरुदेव असतांना काहीच अशक्य नाही’, अशी श्रद्धा वाढणे
‘आम्ही सेवा केलेला विशेषांक संतांना आवडावा’, असे आम्हाला तीव्रतेने वाटत होते; पण ‘फळाची अपेक्षा नको, तर शिकण्याच्या स्थितीत रहाता आले पाहिजे’, हे या विशेषांकाची सेवा करतांना आम्हाला शिकायला मिळाले.
एरव्ही अल्प वेळेत आणि अल्प साधकांमध्ये ज्या गोष्टी करणे अशक्य आहे, ते गुरूंच्या कृपेनेच शक्य झाले. ‘अशक्यही शक्य करतील स्वामी ।’, या पंक्तीची आम्हाला प्रचीती आली. या सर्व प्रक्रियेत माझी सकारात्मकता वाढली आणि ‘गुरुदेव असतांना काहीच अशक्य नाही’, अशी दृढ श्रद्धा निर्माण झाली.
‘श्री गुरूंनी मला ही सेवा करण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी दिली’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. पूजा दिलीप नलावडे (आताच्या सौ. आनंदी अतुल बधाले), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०२१)
सौ. आनंदी बधाले यांना सुचलेली भावकाव्ये !
असे कृपासिंधु श्री गुरु लाभले ।
जरी असंख्य चुका करतो आम्ही ।
तरी जवळ घेता आम्हांसी तुम्ही ।।
असे कृपासिंधु श्री गुरु लाभले।
म्हणून भाग्यवान जाहलो आम्ही ।। १ ।।
अनन्यभावे कृतज्ञ रहावे ।
तुम्हाला अपेक्षित असे आम्ही घडावे ।। २ ।।
‘सनातन प्रभात’ची महती सांगण्या अपुरे शब्द आमचे ।
‘सनातन प्रभात’ रूप तुमचे, प्रतिदिन भेटूनी भाग्य उजळता आमचे ।
‘सनातन प्रभात’ असे गुरूंची छाया, व्यक्त होई साधकांवरील माया ।। १ ।।
‘सनातन प्रभात’ असे माध्यम गुणवृद्धीचे, पाठ देई साधनेचे ।
‘सनातन प्रभात’ आपत्काळात साधकांचा आधार असे ।। २ ।।
‘सनातन प्रभात’ असे माध्यम हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ।
तेजस्वी ‘सनातन प्रभात’ची महती सांगण्या अपुरे शब्द आमचे ।। ३ ।।
श्री गुरु आहेत आपल्या सोबती ।
साधकांनो, सांगत असे ‘सनातन प्रभात’ आपणांस ।
भेटत राहीन वेळोवेळी असाच ।। १ ।।
जरी कितीही आपत्काळ आला भीषण ।
तरी श्री गुरु करतील आपुले रक्षण ।। २ ।।
करावी प्रयत्नांची शर्थ, श्री गुरु देतील सामर्थ्य ।
ठेवून दृढ श्रद्धा, वाढवूनी भक्ती, श्री गुरु आहेत आपल्या सोबती ।। ३ ।।
काव्यात्मक बोल लिहिले आपल्याला स्मरूनी ।
अर्पिते ही शब्दसुमने श्रीविष्णूच्या चरणी ।। ४ ।।
– कु. पूजा दिलीप नलावडे (आताच्या सौ. आनंदी अतुल बधाले), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०२१)
विशेषांक अधिकाधिक चैतन्यदायी आणि भावपूर्ण होण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन !१. ‘जन्मोत्सव विशेषांक’ ही साधकांसाठी आपत्काळातील संजीवनी आहे. सध्या साधक बाहेर काही भागांत तरी जाऊन अंकांचे वितरण करू शकतील, अशी स्थिती आहे. पुढील वर्षी अधिक बिकट स्थिती असणार आहे. त्यामुळे यंदाच अधिकाधिक प्रयत्न करूया. हे अंक साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि ज्यांचा ज्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव आहे, त्या सर्वांपर्यंत अधिकाधिक पोचवूया. आपत्काळासाठी साधकांना हे अंक संग्रही ठेवता येतील. २. हा विशेषांक असा असायला हवा की, आपत्काळात जेव्हा साधकांना अन्य गोष्टी उपलब्ध नसतील, तेव्हा हा विशेषांक केवळ उघडला, तरी साधकांना गुरुदेवांचे अवतारी चैतन्य मिळावे. ३. जन्मोत्सवासाठी लिखाण निवडतांना केवळ बुद्धीच्या स्तरावर विचार न करता सनातनच्या गुरुपरंपरेचे अवतारी महात्म्य समष्टीपर्यंत पोचून साधकांचा श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांविषयी भाव वृद्धींगत व्हावा, त्यांची श्रद्धा दृढ व्हावी, असे लिखाण निवडण्याविषयी त्या सुचवतात. या संदर्भात वेळोवेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी बोलतांना ‘साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारी तत्त्व मिळावे’, अशी तळमळ त्यांनाच अधिक होती’, असे मला जाणवले. केवळ सेवा करणारे हात आमचे होते; पण प्रेरणा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची होती. त्यांनीच आमचे बोट धरून श्री गुरूंची महती सर्वत्र पोचवली. आपत्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘साधकांसाठी किती करू ?’, असेच त्यांना वाटत होते.’ – कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२१) |
‘दैनिक ‘सनातन प्रभात’ चालवणार्या सनातनच्या साधकांनी स्वतःला देव, देश आणि धर्म यांच्यासाठी वाहून घेतले आहे. ‘सनातन संस्थे’चे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी सर्वस्वाचा त्याग करून ही सेना उभी केली आहे. प.पू. डॉ. आठवले यांनी निर्माण केलेले हे साधक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करत आहेत.’ – श्री. शंकर बागवेगुरुजी (हिंदु महासभेचे माजी तालुकाध्यक्ष) (वर्ष २०१७) |
|