स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपकीर्तीला ‘सावरकर गौरव यात्रा’ हे चपखल उत्तर ! – अभिनेते शरद पोंक्षे

‘मी सावरकर’ लिहिणे सोपे आहे; परंतु तसे वागणे फारच कठीण आहे – अभिनेते श्री. शरद पोंक्षे

मालवण (सिंधुदुर्ग) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पेंशनवीर, माफीवीर संबोधले जाते. त्या वेळी त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे काहीच नसते; कारण आमचे वाचन नाही. त्यामुळे स्वा. सावरकर यांना जाणून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचे वाचन करायला हवे. ‘मी सावरकर’ लिहिणे सोपे आहे; परंतु तसे वागणे फारच कठीण आहे. त्यासाठी स्वा. सावरकर यांना जाणून घेणे आवश्यक आहे. काँग्रेसकडून करण्यात येणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपकीर्तीला ‘सावरकर गौरव यात्रा’ आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद हे जाहीरपणे दिलेले चपखल उत्तर आहे, असे प्रतिपादन सिने-नाट्य अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी येथे केले.

 (सौजन्य : Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA)

मालवण येथे ४ एप्रिल या दिवशी झालेल्या ‘स्वा. सावरकर गौरव यात्रे’ची सांगता येथील मामा वरेरकर नाट्यगृहात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने स्वा. सावरकर यांच्यावरील श्री. पोंक्षे यांच्या व्याख्यानाने झाली. या वेळी भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी श्री. पोंक्षे पुढे म्हणाले, ‘‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वा. सावरकर यांनी स्वत:च्या आयुष्याची होळी केली. अशा महान सुपुत्राचा गौरव व्हायला हवा होता; मात्र काँग्रेसने गलिच्छ राजकारण करून स्वा. सावरकर यांना अपकीर्त करण्याचे काम केले. त्यामुळे ‘सावरकर कोण होते ?’ हे सांगण्याची आज आवश्यकता निर्माण झाली. वीर सावरकर आवडणारे आणि त्यांना मानणारे अनेक मुख्यमंत्री झाले; परंतु आता सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्वा. सावरकर गौरव यात्रे’च्या माध्यमातून केले आहे.’’