गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा मिळण्यासाठी विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींचे प्रयत्न !

‘गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित करावे’, अशी विनंती गेली काही वर्षे विविध उच्च न्यायालयांचे माननीय न्यायमूर्ती राज्य आणि केंद्र सरकार यांना करत आहेत. त्याची अनेक कारणे त्या त्या न्यायमूर्तींनी त्यांच्या निकालपत्रात दिली आहेत.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

१. गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याची उत्तरप्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड येथील उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींची विनंती !

गोवंशियांच्या हत्येच्या प्रकरणी उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी महंमद अब्दुल खालिक यांच्या विरुद्ध नोंदवलेला फौजदारी गुन्हा आणि आरोपपत्र रहित करण्याची फौजदारी याचिका नुकतीच असंमत केली. न्यायमूर्तींनी केवळ ही याचिकाच असंमत केली नाही, तर केंद्र आणि राज्य सरकार अन् महाधिवक्ता यांच्याकडे गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याची विनंतीही केली. ‘गोमातेला हा सन्मान दिल्यानंतर गोवंशियांच्या हत्या आपोआपच बंद होतील किंवा गोहत्या करणार्‍यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल’, असे ते म्हणाले. याप्रकरणी त्यांनी एक सखोल आणि अभ्यासपूर्ण असा निवाडा दिला. पूर्वी अशीच विनंती राजस्थान उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती महेश चंद्र शर्मा यांनी एका जनहित याचिकेचा निवाडा देतांना केली होती. वरील दोन न्यायमूर्तींप्रमाणेच उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यादव यांनीही एका याचिकेचा निवाडा करतांना अशीच विनंती केली होती. ‘गोमाता राष्ट्राचे प्रतीक होऊन तिचा सन्मान झाला पाहिजे’, असे विविध न्यायमूर्तींना वाटते.

महंमद खालिक यांच्या प्रकरणात दिलेल्या निकालपत्रात न्यायमूर्ती शमीम अहमद म्हणतात, ‘‘आपण एका धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये रहातो. त्यामुळे येथे सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे. हिंदु धर्मीय गोमातेला दैवी रूप समजतात, तसेत ते तिला ‘माता’ म्हणतात. तिच्यात असे अनेक दैवी गुण आहेत, ज्यामुळे तिला हा मान मिळतो. भगवान शंकरापाशी असलेला नंदी हा गोमातेपासून झालेला आहे. राजा इंद्र हा कामधेनु, म्हणजे गोमातेच्या समवेत असायचा. भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपण गोमातांसह व्यतित केले. अशा प्रत्येक महान विभूती आणि ऋषिमुनी यांना गोमाता पूजनीय होती.’’ न्यायमूर्ती म्हणतात की, समुद्रमंथनातून कामधेनु मिळाली. सप्तऋषी तिचे भक्त होते. वेदांमध्येही आईच्या दुधाची किंमत दर्शवलेली आहे. आईविना असलेल्या लहान मुलालाही गोमातेचे दूध दिले जाते, जे आईप्रमाणेच त्याचे पोषण करते. ख्रिस्तपूर्व ७ व्या शतकात मोठे पशूधन असलेला राजा सर्वाधिक श्रीमंत आणि धनवान समजला जात होता. गायीचे दूध प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात आणि यज्ञात वापरतात. याविषयीचा उल्लेख ‘मनुस्मृती’ आणि ‘महाभारत’ यांमध्ये अनेक ठिकाणी करण्यात आला आहे. गायीपासून मिळणारे पंचगव्य, म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि तिचे शेणही पवित्र समजले जाते.

 २. देशात गोमातेचे विशेष आध्यात्मिक आणि व्यावहारिक महत्त्व !

गोमातेच्या पंचगव्याची वैद्यकीय आणि आध्यात्मिक अशी विविध कारणे आहेत. गोमातेच्या शेणापासून बनवलेल्या गोवर्‍या धार्मिक कार्यक्रम किंवा यज्ञ यांमध्ये वापरतात. घरे सारवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. मध्यंतरी ज्या घरासमोर शेणाचा सडा टाकलेला होता, त्या ठिकाणी अणूऊर्जेचा परिणाम झाला नाही, असे आढळून आले आहे.

पुराणात गोदानाला सर्वांत पवित्र दान म्हटले आहे. भगवान श्रीरामांनीही गोमातेचा दानधर्मासाठी उपयोग केला. महाभारतात भीष्म यांनीही गोमातेचे महत्त्व विशद केले आहे. २१ व्या शतकात जगात काही ठिकाणी गोमातेचे संवर्धन आणि रक्षण यांसाठी प्रयत्न होत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी अपेक्षित होती; पण ती झाली नाही. त्यासाठी अनेक धर्मप्रेमींनी लढा दिला. इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना संत-महंतांसह सहस्रो धर्मप्रेमींनी देहलीत भव्य मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर इंदिरा गांधीच्या आज्ञेवरून पोलिसांनी गोळीबार केला. हे भारत आणि हिंदु धर्मीय यांचे मोठे दुर्दैव आहे.

अध्यात्मात असे सांगितले आहे की, ज्या देशात गोमाता क्लेशामुळे हंबरडा फोडतात, तेथे विनाश होतो. त्यामुळे काही वर्षांपर्यंत भारत आणि हिंदू यांच्यावर मोठ्या प्रमाणात आघात होत होते. वर्ष २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर गंगा, गोमाता आणि गीता यांच्या  संवर्धनासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न होत आहेत. साधू-संतांनी केलेल्या जागृतीमुळे जनमानसात गोमातेला एक विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

३. गायींच्या मृत्यू प्रकरणाची राजस्थान उच्च न्यायालयाकडून विशेष नोंद !

राजस्थानच्या हिंगोनिया गोशाळेत प्रतिदिन गोमातांचे मृत्यू होत होते. राज्य सरकारकडून गोमातेविषयी प्रचंड अनास्था आणि भ्रष्टाचार चालू होता. त्यामुळे ‘या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, दोषींना शिक्षा मिळावी, गोमातेचे संवर्धन व्हावे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, पशूवैद्यकीय अधिकार्‍यांची भरती व्हावी’, अशा विविध मागण्यांसाठी राजस्थान उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या प्रकरणी माननीय न्यायमूर्तींनी अनेक समित्या स्थापन केल्या आणि त्यांच्याकडून अहवाल मागितले.

त्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या गोशाळेमध्ये १५-२० सहस्र गायी होत्या. या गोशाळेला लाखो रुपयांचे अनुदान आणि अर्पण यांद्वारे साहाय्य मिळत होते; परंतु सरकारकडून या धनाचा योग्य विनियोग होत नव्हता. त्यामुळे तेथे प्रतिदिन ५०-६० गायी मृत्यूमुखी पडत होत्या. या प्रकरणी निकालपत्र देतांना न्यायमूर्तींनी सांगितले की, गोमातेचे महत्त्व पर्यावरण आणि आरोग्य यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. ज्यांना नेत्रविकार आहे, त्यांना गोमातेचे दूध डोळ्यांमध्ये टाकल्यास त्यांच्या संदर्भातील अनेक आजार जातात. तोंडाचा अल्सर असला, तर गोमातेच्या तुपाचे सेवन करावे. एवढेच नाही, तर दुर्धर आजार बरे करण्यासाठी सध्याचे विज्ञान किंवा वैद्यकीय उपचारही अपुरे पडत आहेत. ज्या आजारांवर त्यांच्याकडे उपचार नाहीत, तेथे गोमातेचे तूप उपयुक्त ठरते. गंभीर इजा झाल्यासही गोमातेचे तूप कामाला येते. गोमातेचे दूध, दही आणि तूप सेवन केल्यावर प्रतिकारक्षमता वाढते. तसेच डोके आणि मन शांत होते. यासंदर्भात या न्यायमूर्तींनी वेदकालीन संदर्भ दिले. त्यांनी महाभारत आणि रामायण यांची उदाहरणे दिली.

भारताची कृषीप्रधान लोकसंख्या आहे. त्यात गायीच्या शेणाचा उपयोग कसा लाभदायक आहे, हेही न्यायमूर्तींनी सांगितले. न्यायमूर्ती पुढे लिहितात ‘शुकमुनी यांनी परीक्षित राजाला उपदेश केला, त्या वेळी त्यांनी गोमातेचे महत्त्व कशा प्रकारे आहे’, हे नमूद केले. यापूर्वी न्यायमूर्तींनी घटनेचे कलम ४८ (अ), ५१ यांचा संदर्भ देऊन गोमाता आणि गंगा यांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे, हे सरकारचे दायित्व आहे, असे सांगितले होते. त्यांच्यामुळे पर्यावरणाचे संतुलन रहाते.

अशा प्रकारचे विविध संदर्भ विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींनी केंद्र आणि राज्य सरकार यांना दिले आहेत.

४. हिंदूंनी राज्यघटनेच्या माध्यमातून गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत रहावे !

काँग्रेसने इंग्रजांच्या प्रथा पाळण्यात धन्यता मानली. तिने हिंदूंच्या रामसेतू, गोमाता, गंगा, तसेच १२ ज्योतिर्लिंगे आणि चारधाम अशा वैभवांना काहीही महत्त्व दिले नाही. त्यांचा विकास करण्याऐवजी त्यांनी मोठमोठी मंदिरे अधिग्रहित करून त्यांचे धन लुबाडले. सुदैवाने वर्ष २०१४ मध्ये देशात सत्तापालट झाला. तेव्हापासून धार्मिक गोष्टींचे महत्त्व टिकून रहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. तरीही अशा सर्व गोष्टींमध्ये जागरूक राहून हिंदूंनी आपल्या न्याय हक्कांसाठी आग्रही राहिले पाहिजे. तसेच हिंदूंनी राज्यघटनेच्या आधारे गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत रहावे.’

श्रीकृष्णार्पणमस्तु !

गोमातेच्या संरक्षणासाठी तिला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा देण्याची मागणी करावी लागणे हे हिंदूंना लज्जास्पद !

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (मार्च २०२३)