अनुदान लाटण्यासाठी राज्यात ८०० बोगस शाळा चालू !

१०० शाळांची मान्यता रहित !

मुंबई – सरकारकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी राज्यात बोगस शाळा चालवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. नोंदणी नसलेल्या अशा ८०० शाळा सापडल्या आहेत. त्यांच्यात सी.बी.एस्.ई., आय.सी.एस्.ई., आयबी आणि राज्य शिक्षण मंडळाच्या शाळ यांचा यामधे समावेश आहे. यांतील १०० शाळांची मान्यता राज्य सरकारकडून रहित करण्यात आली आहे. या बोगस शाळा चालवणार्‍यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.

बोगस शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा आदी मंडळांच्या शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाकडून मागील काही मासांपासून राज्यातील बोगस शाळांची पडताळणी चालू आहे. बोगस शाळांचा शोध घेण्यासाठी सरकारकडून एक समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बोगस शाळांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले. यामध्ये काही शाळा केवळ कागदोपत्री दाखवण्यात आल्या आहेत. ‘काही शाळांच्या केवळ इमारती असून विद्यार्थी नाहीत’, असे फसवणुकीचे प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे ‘उर्वरित बोगस शाळांविषयी सरकार कोणती भूमिका घेते ?’, हे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस शाळा चालू होईपर्यंत सरकारच्या लक्षात आले नाही का ?’, ‘लक्षात आले, तर कारवाई का करण्यात आली नाही ?’, असे प्रश्‍न शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी उपस्थित होत आहेत.

संपादकीय भूमिका

शेकडोंच्या संख्येत बोगस शाळा चालवणारे आणि त्यांना मान्यता देणारे अशा सर्वांवरच कारवाई व्हायला हवी !