अमित शहा यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या ५४ फूट उंच मूर्तीचे अनावरण !

गृहमंत्री अमित शहा (डावीकडे) हनुमानाची ५४ फूट उंच मूर्ती (उजवीकडे)

बोटाद (गुजरात) – देशभरात श्री हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातीमधील बोटाद जिल्ह्यातील सालंगपूर मंदिरात भगवान श्री हनुमानाच्या ५४ फूट उंच मूर्तीचे अनावरण केले. याखेरीज अमित शहा यांनी सालंगपूर मंदिर परिसरात श्री कष्टभंजनदेव भोजनालयाचे उद्घाटन केले. या मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की, या मंदिरातील श्री हनुमानाच्या दर्शनाने लोकांना शनीदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळते.

ही मूर्ती पंचधातूपासून बनवलेली असून ती ३० सहस्र किलो वजनाची आहे. ही मूर्ती ७ किलोमीटर अंतरावरूनही दिसते. ही मूर्ती बनवण्यासाठी ६ कोटी रुपये व्यय (खर्च) करण्यात आले आहेत. सद्गुरु गोपालानंद स्वामींनी हे मंदिर बांधले होते. या हनुमानाला ‘हनुमानदादा’ या नावाने संबोधले जाते.