तेलंगाणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय यांना मध्यरात्री अटक !

पेपट फुटीच्या प्रकरणात अटक

भाजप प्रदेशाध्यक्ष बंडी संजय यांना पोलीस अटक करताना

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बंडी संजय यांना पोलिसांनी पेपर फुटीच्या प्रकरणी ४ एप्रिलच्या मध्यरात्री त्यांच्या घरातून अटक केली. पोलीस बंडी संजय यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोचल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर ते मोठ्या संख्येने बंडी संजय यांच्या घराबाहेर जमले. त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला.

१. बंडी संजय यांनी त्यांच्या अटकेविषयी एक व्हिडिओ ट्वीट करून म्हटले आहेे की, भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये (बी.आर्.एस्.मध्ये) भीतीचे वातावरण आहे. आधी त्यांनी मला पत्रकारांना मुलाखत देण्यापासून रोखले आणि आता रात्रीच त्यांनी मला अटक केली आहे. माझी चूक एवढीच होती की, मी बी.आर्.एस्. सरकारच्या चुकीच्या कामांवर प्रश्‍न विचारायला चालू केले. मी कारावासात राहिलो, तरी तुम्ही लोक बी.आर्.एस्.ला प्रश्‍न विचारणे सोडू नका.

२. भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रेमेंद्र रेड्डी यांनी राज्य सरकारवर आरोप करतांना म्हटले की, बंडी संजय यांना अवैधरित्या अटक करण्यात आली आहे. ही एकप्रकारे राज्यातील पंतप्रधानांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न आहे. एवढ्या रात्री बंडी संजय यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती ? त्यांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे हेदेखील आम्हाला सांगण्यात आलेले नाही. बंडी संजय यांच्या अटकेच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले जाईल.