१. आठवडाभर ‘छातीत दुखणे, धाप लागणे’ यांसारखे त्रास चालू होणे आणि एक दिवस त्रासांचे स्वरूप तीव्र होऊन ‘हा हृदयविकाराचा झटका तर नाही ना ?’, असा विचार मनात येणे
‘वर्ष २०२१ मध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘मला धाप लागणे, श्वास फुलणे, चक्कर येणे, छातीत दुखणे, डोके फार दुखणे आणि रक्तदाब वाढणे’, असे त्रास चालू झाले होते. त्यामुळे मी थोडा वेळ काम करायचे आणि थोडी विश्रांती घ्यायचे. ७.६.२०२१ या दिवशी माझ्या छातीत पुष्कळ दुखू लागले. मला धाप लागली. या वेळी मला होणार्या वेदना फार तीव्र होत्या. ‘हा हृदयविकाराचा झटका (‘हार्ट अटॅक’) तर नसेल ना ?’, असा विचार माझ्या मनात आला. मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ छातीशी धरून नामजप करण्यास आरंभ केला. माझ्या छातीत असह्य वेदना होत होत्या आणि मला श्वास घेण्यास अडचण येत होती. माझे सारे शरीर घामाने डबडबले होते. मी १५ मिनिटे वरील ग्रंथ छातीशी धरून प.पू. डॉक्टरांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) धावा करत अक्षरशः भूमीवर गडबडा लोळत होते.
२. साहाय्यासाठी आधुनिक वैद्य आणि उत्तरदायी साधक यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने ‘यातून जिवंत रहाणे कठीण आहे’, असे वाटणे
माझी मुलगी कु. शिवानी (आताच्या सौ. शिवानी चेतन देसाई, आधात्मिक पातळी ६२ टक्के) माझ्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत मला धीर देत होती. त्याच समवेत ती आधुनिक वैद्य आणि उत्तरदायी साधक यांना भ्रमणभाष करून साहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करत होती; परंतु कुणालाही संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा ‘भगवंताविना आपले कुणी नाही. आता या त्रासातून मी जिवंत रहाणे कठीण आहे’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले.
३. भगवंताला प्रार्थना केल्यावर आलेली अनुभूती
३ अ. यमदूतांनी साधिकेला काळ्या पाशाने घट्ट बांधून तिचे पंचप्राण शरिराबाहेर खेचल्याचे तिला जाणवणे : माझ्या मनात आले, ‘मी प.पू. गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कुशीत असल्याने चिंता कशाला करायची ?’ मी मला होणार्या त्रासाचे निवारण होण्यासाठी भगवंताला प्रार्थना करत होते. मी डोळे उघडले. तेव्हा मला जाणवले, ‘माझ्या चारही बाजूंनी यमदूत उभे आहेत आणि त्यांनी मला काळ्या पाशाने आवळायला आरंभ केला आहे. एखादे रबर ताणावे, तसे यमदूत माझ्या शरिरातील शक्ती खेचत आहेत. त्यांनी माझ्या शरिरातील पंचप्राण शरिराच्या बाहेर खेचून काढले आहेत. तेव्हा माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले येताच यमदूतांचे पाश वितळून जाऊन यमदूत पळून जाणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेचे पंचप्राण पुन्हा तिच्या शरिरात ठेवणे आणि त्यानंतर तिला संवेदना जाणवून तीव्र त्रास न्यून होणे : मी त्रास निवारण होण्यासाठी प.पू. डॉक्टरांना विनवणी करत होते. त्यांचा धावा करत होते. काही क्षणांतच पूर्वेच्या दिशेने पांढर्या शुभ्र घोड्यावरून प.पू. डॉक्टर वार्याच्या वेगाने माझ्याकडे येत असल्याचे मला जाणवले. त्यांच्या येण्याने यमदूतांनी मला बांधलेले पाश आपोआप विरघळून गेले. यमदूतही घाबरून पळून गेले. प.पू. डॉक्टर घोड्यावरून उतरून माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या शरिराबाहेर काढलेल्या माझ्या पंचप्राणांना हातांत घेऊन हळुवार कुरवाळले आणि पुन्हा माझ्या शरिरात ठेवले. त्यानंतर मला माझ्या शरिरात संवेदना जाणवू लागल्या आणि मला होणार्या तीव्र वेदना न्यून झाल्या. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला आशीर्वाद देऊन ते दिसेनासे झाले. हे सारे एका क्षणार्धात घडले. गुरुदेवांच्या या दिव्य दर्शनाने मी धन्य झाले !
४. कराड येथील ‘कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट’ या रुग्णालयात पुढील उपचारांसाठी जाणे
२४.७.२०२१ या दिवशी आम्ही ‘कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट’, कराड येथे पुढील उपचारांसाठी जाण्याचे ठरवले. तेथे गेल्यावर हृदयविकारतज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) असलेल्या आधुनिक वैद्यांनी ‘टू डी इको’मध्ये अडथळे (ब्लॉक) असण्याची शक्यता वर्तवली. ‘‘तुम्हाला १५ दिवसांपूर्वी झालेला त्रास हा हृदयविकाराचा छोटा झटका असून तुमचे वय लहान असल्यामुळे आणि इच्छाशक्ती चांगली असल्याने तुम्हाला त्यातून लवकर बाहेर पडता आले’’, असे त्यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या ‘टू डी इको’ चाचणीमध्ये फारसे नीट दिसत नव्हते; म्हणून ‘ॲन्जिओग्राफी’ (हृदयातील रक्तवाहिन्यांतील अडथळे शोधण्यासाठी करावयाची चाचणी) करायला लागेल’, असे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांनी २ दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगून २६.७.२०२१ या दिवशी ‘ॲन्जिओग्राफी’ करण्यासाठी येण्यास सांगितले.
(‘टू डी इको’ (2D Echo) तपासणी : या चाचणीमध्ये ध्वनीलहरींच्या साहाय्याने हृदयाचे कार्य प्रत्यक्ष पाहिले जाते. त्यायोगे हृदयातील झडपा, हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या आणि हृदयातून होणारे रक्ताभिसरण तपासले जाते.)
५. विश्रांतीच्या कालावधीत आध्यात्मिक उपाय करण्यावर भर देणे
तेथून घरी आल्यावर दोन दिवस भगवंताने माझ्याकडून पुष्कळ आध्यात्मिक उपाय करवून घेतले. सद्गुरु स्वातीताईंनी (सद्गुरु स्वाती खाडये यांनी) मला या त्रासावर सांगितलेला ‘निर्गुण’ हा जप मी अधिकाधिक केला. मी भगवंताला सारखी प्रार्थना करत होते, ‘माझ्या हृदयात काही अडथळे निर्माण झाले असतील, तर ते दूर होऊ देत किंवा रक्ताच्या गुठळ्या झाल्या असतील, तर त्या विरघळून जाऊ देत. प.पू. डॉक्टरांचे चैतन्य माझ्या हृदयाला ग्रहण करता येऊ दे.’ मी उपायांसाठी सांगितलेले ‘अगस्त्योक्त-आदित्यहृदय’ स्तोत्रही नियमित ऐकत होते. त्याच समवेत मी बिंदूदाबनही करत होते.
६. ॲन्जिओग्राफीच्या वेळी काढलेल्या ‘ईसीजी’मध्ये (हृदयाच्या स्पंदनांच्या आलेखामध्ये) अडथळा असल्याचे आधुनिक वैद्यांच्या लक्षात येणे
आम्ही ‘ॲन्जिओग्राफी’साठी रुग्णालयात सकाळी १० वाजता पोचलो. मला ‘ॲन्जिओग्राफी’ करण्यासाठी तेथील कक्षात नेण्यात आले. तेव्हा ‘गुरुदेव मला चैतन्य देत आहेत’, असा मी भाव ठेवला होता. मी सतत ‘निर्गुण’ हा जपही करत होते. काही वेळ माझ्याकडून ‘प.पू. डॉक्टर’, असाही जप होत होता. काही वेळाने ‘ईसीजी’ (हृदयस्पंदनांचा आलेख) काढल्यानंतर त्यात अडथळा असल्याचे आधुनिक वैद्यांना आढळले.
७. शस्त्रकर्म कक्षात प्रवेश करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत प्रवेश करत आहे’, असा भाव ठेवणे आणि प्रत्यक्ष ‘ॲन्जिओग्राफी’मध्ये एकही अडथळा न दिसल्याने आधुनिक वैद्यांना पुष्कळ आश्चर्य वाटणे
आधुनिक वैद्यांनी मला ‘ॲन्जिओग्राफी’ चाचणी करण्यासाठी नेण्यापूर्वी माझा रक्तदाब पाहिला. तेव्हा तो १३० – ९० इतका होता. मागील पूर्ण मासात माझा रक्तदाब १७० – १०० असा असायचा. (सर्वसाधारणपणे रक्तदाब १२०-८० एवढा असतो.) आधुनिक वैद्यांनी मला ‘ॲन्जिओग्राफी’साठी जाण्यापूर्वी स्थिर रहाण्यास सांगितले. ‘छोटीशी प्रक्रिया आहे. घाबरू नका’, असे सांगून त्यांनी मला आधार दिला. तेव्हा ‘प.पू. डॉक्टर माझ्या समवेतच आहेत’, असे मी अनुभवत होते. शस्त्रकर्म कक्षात प्रवेश केल्यावर तेथील मोठमोठी यंत्रे आणि भयानक शांतता पाहून मी एक क्षणभर घाबरले. त्या वेळी मी ‘प.पू. डॉक्टरांच्या खोलीत प्रवेश करत आहे, म्हणजेच निर्गुणात प्रवेश करत आहे आणि निर्गुणाची शांतता अनुभवत आहे’, असा भाव ठेवला. तेथे लावलेल्या छायाचित्रकामुळे मला तेथील पडद्यावर ‘माझ्या हृदयाचे काम कसे चालू आहे ?’ हे दिसत होते. ‘ॲन्जिओग्राफी’ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘अभिनंदन ! तुमच्या हृदयात एकही अडथळा नाही.’’ ‘टू डी इको’ च्या तपासणीमध्ये आणि ‘ईसीजी’ मध्ये अडथळे दिसत होते; परंतु ‘आता अडथळे दिसत नाहीत’, याविषयी त्यांनी पुष्कळ आश्चर्य व्यक्त केले.
८. कृतज्ञता !
हे ऐकून मला प.पू. डॉक्टर आणि सद्गुरु स्वातीताई यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्यांनीच मला नामजपादी उपाय सांगून आधार दिला. त्यांच्या सदिच्छेमुळेच माझ्या हृदयातील अडथळा नाहीसा झाला आणि भगवंताने हे सुंदर क्षण मला अनुभवायला दिले. ‘भगवंता, या सार्या कालावधीत सहसाधकांनी केलेले सहकार्य, शिवानीने केलेले मातृवत् प्रेम, हे सारे तुझ्या कृपेमुळेच मला अनुभवता आले. यासाठी हे भगवंता, मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्रीमती माया शिंदे (वय ४८ वर्षे), सातारा (११.७.२०२१)
|