फोंडा – ‘स्काय बुटां’ची (बर्फावरील खेळ खेळण्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष पद्धतीच्या बुटांची) निर्मिती करणार्या जगविख्यात आस्थापनाचे मालक आणि दावोस, स्वित्झर्लंड येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. हान्स-मार्टिन यांनी स्वित्झर्लंडमध्ये ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून जगभरातील उद्योजकांना साधनेची गोडी लागून त्यांना मनःशांती लाभावी, यासाठी ते प्रयत्न करतात.
‘लोभ आणि स्वार्थ यांच्यावर आधारित व्यवसायपद्धत समाजाला उपयुक्त नाही’, हे हान्स-मार्टिन यांच्या लक्षात आले; म्हणून त्यांनी शाश्वत व्यवसायपद्धत विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला. असे करण्यासाठी त्यांनी एक संस्था स्थापन केली. ही संस्था १३५ हून अधिक आस्थापनांना जोडते. ‘समाज आणि पर्यावरण यांच्यावर न्यूनतम वाईट परिणाम व्हावा’, यासाठी या संस्थेने व्यवसायपद्धत (business model) निर्माण केली आहे. हान्स-मार्टिन हे वर्ष २०१८ पासून साधना करत आहेत. ‘व्यावसायिक जग, तसेच सामान्य जनता यांना भेडसावणार्या प्रश्नांची उत्तरे अध्यात्मशास्त्रात मिळतात’, हे त्यांना उमगले आहे. या लेखाद्वारे त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देत आहोत.
१. ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ची स्थापना करून जगभरातील उद्योजकांना आनंदप्राप्तीचे द्वार खुले करणे !
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या (विश्व आर्थिक मंचाच्या) वतीने प्रतिवर्षी दावोस, स्वित्झर्लंड येथे ‘आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद’ आयोजित केली जाते. जागतिक स्तरावर उद्योग, शिक्षण आणि राजकारण या क्षेत्रांतील अग्रणी लोकांना एकत्र आणून ‘जगाची स्थिती सुधारणे’, हा ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चा उद्देश आहे. ‘फोरमकडून प्रतिवर्षी दावोस येथे आयोजित केलेल्या परिषदेमध्ये भौतिकवाद आणि उच्चभ्रू लोक यांना केंद्रभूत ठेवले जाते’, हे हान्स-मार्टिन यांच्या लक्षात आले. ‘ही परिषद सर्वसामान्य लोकांसाठी खुली व्हावी’, अशी त्यांची इच्छा होती. ‘आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे कामकाज चालू असतांना त्याला उपस्थित असणार्या उद्योजकांना अध्यात्म शिकण्यासाठी, तसेच शांतीचा अनुभव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे’, हा त्यांचा मानस होता. त्यातूनच त्यांनी ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ची स्थापना केली. ‘आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद’ ज्या ठिकाणी आयोजित केली जाते, त्याच्या जवळच हान्स-मार्टिन यांच्या मालकीची इमारत आहे. या इमारतीला त्यांनी ‘हाऊस ऑफ बॅलन्स’चे स्वरूप दिले. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ची परिषद चालू असतांना त्या काळात जे उद्योजक किंवा व्यावसायिक परिषदेत सहभागी होतात, त्यांना ‘हाऊस ऑफ बॅलन्स’मध्ये निमंत्रित केले जाते. येथे त्यांना ‘अध्यात्म, तसेच मनःशांती मिळण्यासाठी काय करायला हवे ?’, हे समजावून सांगण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात.
२. ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
वर्ष २०२२ मध्ये दावोस येथे ‘आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद’ चालू असतांना ‘हाऊस ऑफ बॅलन्स’मध्ये अध्यात्म आणि मनःशांती यांविषयी जाणून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला ४०० उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थित होते. जानेवारी २०२३ मध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने ‘आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद’ आयोजित केली, त्याच वेळी हान्स-मार्टिन यांच्या पुढाकाराने ‘हाऊस ऑफ बॅलन्स’मध्ये अध्यात्माविषयी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात विविध संतांना अध्यात्माविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला २ सहस्र लोक उपस्थित होते. या वेळी लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संतांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
३. आध्यात्मिक नेतृत्व विकासासाठी ‘हाऊस ऑफ बॅलन्स’ करत असलेले प्रयत्न !
‘अध्यात्मातील मूलभूत तत्त्वे उदा. सात्त्विकता, नामजप, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसारख्या सूत्रांचे उद्योजक अन् व्यावसायिक यांना आकलन होण्यासाठी ‘हाऊस ऑफ बॅलन्स’चे व्यासपीठ सर्वांना उपलब्ध करून देणे’, हा हान्स-मार्टिन यांचा मानस आहे. या सूत्रांसाठी, तसेच ‘आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक मार्गाने कसे नेतृत्व करावे ?’, याविषयी व्यावसायिक प्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी पाक्षिक सत्संग आयोजित करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
– श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१.४.२०२३)
हान्स-मार्टिन यांची ओळखहान्स-मार्टिन हैरलींग हे दावोस, स्वित्झर्लंड येथील रहिवासी आहेत. ते अस्थीरोगतज्ञ आहेत. हान्स-मार्टिन हे २० वर्षांचे असतांना त्यांनी बुटांची निर्मिती करणारा स्वतःचा व्यवसाय चालू केला. गेली अनेक दशके त्यांनी ‘यशस्वी उद्योजक’ म्हणून लौकिक मिळवला आहे. ते अनेक हिवाळी क्रीडा आस्थापनांच्या संशोधन आणि विकास मंडळांचे, तसेच या आस्थापनांच्या व्यवस्थापन मंडळाचेही सदस्य आहेत. |
हान्स-मार्टिन यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या गोवा येथील संशोधन केंद्राला भावस्पर्शी भेट !
हान्स-मार्टिन यांनी मार्च २०२३ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या गोवा येथील संशोधन केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांनी साधनेच्या प्रयत्नांविषयी जाणून घेतले. त्या वास्तव्याच्या काळात त्यांना वेगवेगळे आध्यात्मिक अनुभव आणि अनुभूती आल्या.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या डोक्यावर मुकुट दिसून त्यात देवतांचे अस्तित्व जाणवणे
आत्यंतिक शारीरिक त्रास होत असतांनाही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हान्स-मार्टिन यांना भेटले. हान्स-मार्टिन यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पाहिले, तेव्हा त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या डोक्यावर मोठे इंद्रधनुष्य दिसले, तसेच त्यांनी ७ थर असलेला मुकुट परिधान केल्याचे, तसेच मुकुटाच्या प्रत्येक थरात वेगवेगळ्या देवता असल्याचे हान्स-मार्टिन यांना सूक्ष्मातून दिसले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सोनेरी बाजूबंध परिधान केल्याचेही त्यांना सूक्ष्मातून दिसले.
२. संशोधन केंद्रात ईश्वरी तत्त्व असल्यामुळे तेथील साधकांमध्ये कुटुंबभावना जाणवणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रातील साधकांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी आहे, तसेच त्यांची संस्कृतीही वेगळी आहे. असे असले, तरी सर्वांमध्ये ईश्वरी तत्त्व असल्यामुळे येथे कुटुंबभावना आहे’, हे हान्स-मार्टिन यांना जाणवले.
– श्री. शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१.४.२०२३)