तिघांना जीवदान देणार्‍या अंकुरकुमार प्रसाद याला मुख्यमंत्र्यांकडून १ लाख रुपयांचे बक्षीस

‘शौर्य’ पुरस्कारासाठी शिफारस करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

अंकुरप्रसाद याचा सत्कार करतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत. समवेत मुलाचे माता-पिता आणि मंत्री बाबूश मोन्सेरात

पणजी, १ एप्रिल (वार्ता.) – कुंभारजुवे येथे ३ मुलांना बुडतांना धाडसाने वाचवणारा अंकुरकुमार संजय प्रसाद (वय १० वर्षे) या शाळकरी विद्यार्थ्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ लाख रुपये देऊन सन्मान केला. केंद्राकडे शौर्य पुरस्कारासाठी अंकुरकुमारच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी सांगितले.

कुंभारजुवे येथे सरकारी प्राथमिक शाळेत शिकणारा अंकुरकुमार संजय प्रसाद हा विद्यार्थी मूळ बिहार येथील असून त्याचे कुटुंबीय गोव्यात स्थायिक झालेले आहे. अंकुरकुमार संजय प्रसाद याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील मुख्यमंत्री दालनात अंकुरकुमार प्रसाद याला १ लाख रुपयांचा धनादेश दिला. याप्रसंगी अंकुरकुमारचे आई-वडील आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी अंकुरकुमार याच्या शौर्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मांडला.