वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई वडिलांविषयी कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते. पुढे काही मृत आई-वडिलांनी पूर्वज होऊन कुटुंबियांना त्रास दिल्यास त्यात आश्चर्य ते काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
आपण मोठ्या आनंदाने सांगतो की, आपली भारतीय संस्कृती जगात महान आहे. भारतात महाराष्ट्राला पुरोगामी मानले जाते; पण आपले हे सर्व दावे सपशेल खोटे आहेत. एका अहवालानुसार देशात अनुमाने ७२८ वृद्धाश्रम असून यामध्ये ९७ सहस्र वृद्ध स्त्री-पुरुष रहातात. आपल्या महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम ‘मातोश्री वृद्धाश्रम योजने’च्या अंतर्गत विनाअनुदान तत्त्वावर चालवले जातात. पुण्याला ‘सुसंस्कृत शहर’ समजले जाते; पण तेथे ६५ वृद्धाश्रम आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटीहून अधिक आहे. हिंदूंना लाज वाटायला पाहिजे की, समाजाला वृद्धाश्रमाची आवश्यकता का पडली ? आई-वडिलांना न सांभाळण्याची कुवृत्ती समाजात वाढलेली दिसून येते.
१. अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम हा हिंदु संस्कृतीला लागलेला कलंक !
भारतात ७२८ वृद्धाश्रम असून त्यात एकही मुसलमान वृद्धाश्रमात नाही. मुसलमान समाज आपल्या आई-वडिलांची योग्य ती काळजी घेऊन सांभाळतात. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. हिंदूंचे अनाथाश्रम, वृद्धाश्रम ठिकठिकाणी आहेत. सरकारलाही वृद्धाश्रम काढण्याची आवश्यकता भासणे, हे अत्यंत लाज आणणारे आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम हा हिंदु संस्कृतीला लागलेला कलंक आहे.
२. … तर पुढे तुमची मुले तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतील ?
आपले आई-वडील मुलांना जड व्हावेत, ही नीच वृत्ती समाजात बळावली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आणखी १०० वृद्धाश्रम उघडण्याची घोषणा केली आहे, ही आम्हाला किती शरमेची गोष्ट आहे. अशाने खरच भारताचा विकास होईल का ? आई-वडिलांना सांभाळण्याच्या ऐवजी घरात कुत्र्याला सांभाळले जाते. त्या कुत्र्याचा मासिक ५ सहस्र रुपये व्यय खर्च येतो. आई-वडिलांना सांभाळण्याची लाज वाटते का ? आज मुले आई-वडिलांना वृद्धाश्रम दाखवतात; पण पुढे तुम्ही म्हातारे झाल्यावर तुमची मुले तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतील. याचे थोडेसुद्धा भय तुम्हाला वाटत नाही का ?
३. लहानाचे मोठे करणार्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणे हे मुलांसाठी लाजिरवाणे
आई-वडील हीच आपली आयुष्यातील शेवटची संपत्ती असते. तेव्हा त्यांचा जन्मभर सांभाळ करणे, हेच प्रत्येक तरुणाचे कार्य असते; कारण आपल्याला लहानाचे मोठे त्यांनी यासाठीच केलेले असते की, म्हातारपणी त्यांची आधाराची काठी आपण होणे आवश्यक असते. आई-वडिलांचा सांभाळ कुणी करायचा; म्हणून दोघा भावांमध्ये वाद निर्माण होऊन जन्मदात्याचीच हत्या झाल्याच्या घटना कलियुगात पहायला मिळतात. ‘आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि हे जग दाखवले. हालअपेष्टा भोगून तुम्हाला लहानाचे मोठे केले आणि त्यांचा सांभाळ करण्याऐवजी वृद्धाश्रमात पाठवतो’, असे वागणे हे मुलांसाठी लाजिरवाणे आहे. एकीकडे आपण ‘मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’, म्हणत आई-वडिलांना देव मानतो.
४. मुलांवर संस्कार केल्यास वृद्धाश्रमांची संख्या न्यून होईल !
वडिलांचे वचन आणि माता कैकयीच्या आज्ञेचे पालन करणारे प्रभु श्रीराम, आपल्या अंध माता-पित्याची न थकता सेवा करणारा श्रावणबाळ, आई-वडिलांच्या सेवेत खंड पडायला नको; म्हणून विठ्ठलाला प्रतीक्षा करायला लावणारा भक्त पुंडलिक, असे महान आदर्श आपल्या भारत देशात होऊन गेले. अशा आदर्श भारत देशामध्ये आई-वडिलांना सांभाळणे कठीण वाटणे, हे अतिशय दुर्दैवी आणि संकुचितपणाची परिसीमाच आहे. समाजात सामाजिक दायित्व शिकवले जात नाही आणि ‘एक मुलगा एक मुलगी’, ही पद्धत आल्याने काय झाले. एकुलता एक म्हणून मुलांचे अधिकच लाड होत आहेत. तेच आज घातक ठरत आहे. आई-वडील मुलांच्या चुका नजरेआड करतात, तसेच मुलांचे लाड केल्यामुळे मुले उनाड होत चालली आहेत. आपल्या मुलांना संस्कार द्या, तरच वृद्धाश्रम न्यून होतील. मुलांना योग्य संस्कार दिले नाही, तर आपल्या पुढे भयानक वास्तव ‘आ’ वासून येत आहे, हे लक्षात ठेवा.
– श्री. पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर, श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ (साभार : सामाजिक माध्यम)