आग्वाद किल्ल्यातील मद्यविक्री केंद्राचा ‘ना हरकत दाखला’ सरकारने मागे घेतलेला नाही

‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा

पणजी, ३१ मार्च (वार्ता.) – ऐतिहासिक आग्वाद किल्ल्यातील मद्यविक्री केंद्राच्या विरोधात स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि नागरिक यांनी आवाज उठवूनही या केंद्राचा ‘ना हरकत दाखला’ अजूनही मागे घेण्यात आलेला नाही. सरकारने ‘ना हरकत दाखला’ मागे घेण्यासाठी कोणतीही सूचना केलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती दिली.

पोर्तुगीज काळात आग्वाद किल्ल्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांना डांबून ठेवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. गोवा सरकारने या ऐतिहासिक आग्वाद किल्ल्याचे आता एका वारसा स्थळात रूपांतर केले आहे. या वारसा स्थळावर गोवा मुक्तीलढ्याविषयी प्रेरणा देणारी माहिती आता उपलब्ध करण्यात आली आहे. या ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये मद्यविक्री दुकान चालू करणे हा स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे आणि हे केंद्र त्वरित बंद करावे, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि जागरूक नागरिक यांनी केली होती. सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार किल्ल्यातील मद्यविक्री केंद्रासाठी ‘वॉटरफ्रंट एक्स्पीरियन्स प्रा.लि.’चे जी. रवि शंकर यांना अनुज्ञप्ती देण्यात आली आहे आणि या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे. सरकारने संबंधित कंत्राटदाराला किल्ल्यावर भेट देण्यासाठी प्रौढासाठी प्रत्येकी २०० रुपये, तर लहान मुलांसाठी प्रत्येकी १०० रुपये, गोमंतकीय प्रौढासाठी प्रत्येकी १०० रुपये, तर लहान मुलांसाठी ५० रुपये, तसेच विदेशी नागरिकांसाठी प्रत्येकी ४०० रुपये शुल्क आकारण्यास अनुमती दिलेली आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंब, सैन्यदल किंवा शाळेचे विद्यार्थी यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कंत्राटदाराला करारानुसार गोवा पर्यटन विकास महामंडळाला प्रतिवर्ष १ कोटी ५० लाख ७० सहस्र रुपये वार्षिक अनुज्ञप्ती शुल्क या नात्याने द्यावे लागणार आहे.


हे ही वाचा –

आग्वाद किल्ल्यातील मद्यविक्री केंद्र

ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !
https://sanatanprabhat.org/marathi/654350.html

आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्री केंद्र कायमस्वरूपी बंद झाल्याविषयी सुस्पष्टता नाही
https://sanatanprabhat.org/marathi/656564.html