शहरातील बससेवा विस्कळीत
कोल्हापूर – सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी महापालिका परिवहनच्या कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे परिवहनच्या सर्वच बसगाड्या कार्यशाळेमध्ये थांबून आहेत. त्यामुळे शहरातील सार्वजनिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ‘प्रशासनाच्या ठाम आश्वासनाविना संप मागे घेणार नाही’, अशी भूमिका संपावर गेलेल्या कर्मचार्यांनी मांडली आहे. मुक्कामाला असणार्या २० बसगाड्या परत बोलावण्यात आल्या आहेत, तर ‘एकही बस बाहेर पडू दिली जाणार नाही’, अशी चेतावणी ‘म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियन’चे निशिकांत सरनाईक यांनी दिली आहे. त्यांना ‘रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन’ने पाठिंबा दिला आहे.
परिवहन प्रशासनाकडून अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी वेतन आयोग आणि कर्मचारी यांना कायम करण्याविषयी जूनमध्ये कार्यवाही करण्यात येईल. महागाई भत्त्याची २५ टक्के रक्कम जूनच्या वेतनात जमा करण्यात येईल, अशी भूमिका मांडली होती; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सरनाईक यांनी संपाची घोषणा केली.
२२ मार्गांवरील बस बंद होणार !
केंद्र सरकारने घोषित केलेल्या धोरणानुसार आयुर्मान संपलेल्या परिवहनच्या बसगाड्या १ एप्रिलपासून बंद होणार आहेत. त्यामुळे केवळ ५५ बसगाड्या उपलब्ध होणार आहेत. बस चुकल्यास प्रवाशांना पुष्कळ वेळ ताटकळत उभे रहावे लागणार आहे. परिवहनकडून मार्गावरील बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून अल्प उत्पन्न असलेल्या मार्गावरील बस बंद करण्यात येत आहेत. त्याव्यतिरिक्त २२ मार्गांवर धावणार्या बसमधील प्रत्येकी १ बस न्यून केली जाणार आहे. विविध मार्गांवरील १० फेर्या न्यून केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
संपादकीय भूमिकाबंद म्हणजे राष्ट्रीय हानी, तसेच नागरिकांची गैरसोय ! संप होणार नाही, या दृष्टीने समस्या वेळेत सोडवणे सर्वांसाठी हितकारक आहे ! |