राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने रायगड येथील अनधिकृत दर्गा त्‍वरित हटवा  !

मनसे आणि हिंदु जनजागृती समिती यांची सिडकोकडे मागणी !

पनवेल, २९ मार्च (वार्ता.) – नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावरील पारगाव-दापोली गावाजवळील जे.एन्.पी.टी. महामार्गाच्‍या डाव्‍या बाजूला असलेल्‍या टेकडीवर मजार, दर्गा आणि अन्‍य अनधिकृत बांधकाम आहे. या ठिकाणाहून नवी मुंबई विमानतळ आणि भाभा अणूशक्‍ती केंद्र टेहाळणीच्‍या टप्‍प्‍यात आहे. काही दिवसांपूर्वी येथून मोठ्या दुर्बिणीने टेहाळणी करणार्‍या संशयितांना ग्रामस्‍थांनी पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले होते. त्‍यामुळे भविष्‍यात या ठिकाणाहून कोणते राष्‍ट्र आणि समाज विघातक कृत्‍य घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने या दर्ग्‍यासह येथील सर्व अनधिकृत बांधकाम त्‍वरित हटवावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना यांनी सिडकोकडे केली आहे.

अनधिकृत दर्गा हटवण्‍याच्‍या मागणीसाठी एकत्रित आलेले राष्‍ट्रप्रेमी

सिडकोचे सहव्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे आणि अपर जिल्‍हाधिकारी संजय जाधव यांची २९ मार्च या दिवशी भेट घेऊन हिंदु जनजागृती समिती आणि मनसे यांच्‍या वतीने निवेदन देण्‍यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्‍ते वैद्य उदय धुरी, मनसेचे पनवेल उपशहरप्रमुख श्री. संजय मुरकुटे, रायगड जिल्‍ह्याचे सचिव श्री. अतुल चव्‍हाण, रायगड जिल्‍हा संघटक श्री. किरण गुरव, मनसेच्‍या वाहतूक सेनेचे अध्‍यक्ष श्री. सचिन जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. वसंत सणस यांसह अन्‍य राष्‍ट्रप्रेमी नागरिक उपस्‍थित होते.

या निवेदनात म्‍हटले आहे की, हे अनधिकृत बांधकाम सिडकोच्‍या (शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ) कार्यक्षेत्रात आहे. वर्तमानपत्रांतील वृत्तांनुसार सिडकोकडून या अनधिकृत बांधकामाच्‍या विरोधात नोटीस पाठवण्‍यात आली आहे. मनसेनेही या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी यापूर्वी सिडकोकडे  केली आहे; परंतु हे अनधिकृत बांधकाम अद्यापही तसेच आहे. नोटीस पाठवूनही बांधकाम हटवले जात नसेल, तर सिडकोने पोलिसांच्‍या साहाय्‍याने हे अनधिकृत बांधकाम निष्‍कासित करावे. अवैध बांधकाम असलेली ही जागा वक्‍फ मंडळाकडे हस्‍तांतरित करण्‍याचे षड्‍यंत्र चालू असल्‍याचे आम्‍हाला खात्रीशीर सूत्रांकडून समजले आहे. जागेची मालकी वक्‍फ मंडळाकडे गेली, तर हे अनधिकृत बांधकाम हटवण्‍यासाठी न्‍यायालयात जाऊन लढा द्यावा लागेल. त्‍यामुळे या अवैध बांधकामावर तातडीने कारवाई करण्‍याची आवश्‍यकता आहे.

…अन्‍यथा समस्‍त राष्‍ट्रप्रेमींना रस्‍त्‍यावर उतरावे लागेल !

या अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करण्‍यासाठी काही अधिकार्‍यांनी आर्थिक गैरव्‍यवहार केला असल्‍याची चर्चा समाजात होत आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सिडकोने याविषयी सत्‍यता पडताळून भ्रष्‍टाचार आढळल्‍यास संबंधितांवर कारवाई करावी. या अनधिकृत बांधकामाविषयी स्‍थानिकांसह समस्‍त राष्‍ट्रप्रेमी नागरिकांच्‍या भावना तीव्र आहेत. हे अवैध बांधकाम त्‍वरित हटवावे, अन्‍यथा हिंदु जनजागृती समितीसह समस्‍त राष्‍ट्रप्रेमी संघटना आणि नागरिक यांना रस्‍त्‍यावर उतरावे लागेल, अशी चेतावणी या निवेदनाद्वारे देण्‍यात आली आहे.