सावरकर गौरव यात्रा !

‘मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्‍ट्रात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्‍याचे घोषित केले आहे. हे हिंदुत्‍व जागरणाच्‍या दृष्‍टीने एक पुढचे पाऊल ठरू शकते’, हे लक्षात घेतले पाहिजे. वारंवार स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्‍याच्‍या राहुल गांधी यांच्‍या अश्‍लाघ्‍य प्रयत्नांमुळे किंवा राजकीय पटलावरील घडामोडींमुळे आणि राजकीय उद्देशाने का होईना, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवन गौरव करणारी यात्रा महाराष्‍ट्रभर निघत असेल, तर आतापर्यंत काँग्रेस सरकारने स्‍वातंत्र्यविरांना नजरकैदेत ठेवून, त्‍यांना दुर्लक्षून त्‍यांचा जो काही भयंकर अवमान केला आहे, तो काही अंशाने तरी यामुळे भरून निघण्‍यास चालना मिळेल.

राहुल गांधी यांनी वारंवार केलेल्‍या सावरकरांच्‍या अवमानाच्‍या प्रतिवादाच्‍या निमित्तानेे आणि त्‍यातच कालगतीनुसार गेल्‍या ५ वर्षांत हिंदुत्‍वाच्‍या राष्‍ट्रीयत्‍वाचे वारे नव्‍याने वाहू लागल्‍याने सावरकरांविषयी थोडी जनजागृती झाली आहे, अन्‍यथा आताच्‍या बाल आणि युवा पिढीला स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनन्‍यसाधारण योगदान लक्षात येण्‍यास दुसरे व्‍यापक साधनही उपलब्‍ध नव्‍हते. राष्‍ट्र आणि धर्म प्रेमी यांनी, तसेच सावरकरांचे अभ्‍यासक, अनुयायी यांनी त्‍यांच्‍या विचारांचा वारसा विविध माध्‍यमांतून जपून ठेवला आहेच; परंतु वरील यात्रेच्‍या निमित्तानेही जनसामान्‍यांपर्यंत स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव आणि त्‍यांचे योगदान पोचण्‍यास काही प्रमाणात तरी साहाय्‍यच होणार आहे. माध्‍यमांनाही याची नोंद घ्‍यावी लागणार आहे. त्‍यामुळे ‘हिंदुत्‍वाच्‍या राष्‍ट्रीयत्‍वाची चर्चा’ चालू रहाणार आहे. हिंदुत्‍वनिष्‍ठ विचारांच्‍या एका मंथनाचाच हाही एक भाग होईल, यात शंका नाही. या निमित्ताने स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या बहुआयामी व्‍यक्‍तीमत्त्वातील विविध पैलू परत एकदा घराघरांत आणि नव्‍या पिढीपर्यंत पोचण्‍यास, त्‍यांचे विचार आणि त्‍याग अन् त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वातील उत्तुंगता युवकांना लक्षात येण्‍यास थोडेतरी साहाय्‍य व्‍हावे, अशी अपेक्षा या महाराष्‍ट्रातून निघणार्‍या ‘सावरकर गौरव यात्रे’कडून आहे.

ध्रुवीकरणाला चालना

राहुल गांधी यांनी ‘ते सावरकर नाहीत, गांधी आहेत’, असे म्‍हणून स्‍वतःच एकप्रकारे गांधी आणि सावरकर या वैचारिक ध्रुवीकरणाला चालना दिली आहे. आता ही केवळ दोन मोठ्या व्‍यक्‍तींची आडनावे उरलेली नसून भारताच्‍या इतिहासातील आणि वर्तमानातील वैचारिक परंपरेचे ते दोन धु्रव आहेत. यातील ‘सावरकर’ हे अर्थातच प्रखर राष्‍ट्रीय वैचारिक परंपरेचे असल्‍याचे स्‍पष्‍ट असल्‍याने समाजाला ‘आपल्‍याला कुठल्‍या वैचारिक परंपरेचे पाईक व्‍हायचे आहे ? हे ठरवायची वेळ आली आहे’, असाही एक संदेश यातून अप्रत्‍यक्षपणे जात आहे.

वाईटातून चांगले !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘माफीवीर’ म्‍हणून घोर अवमान करणार्‍या राहुल गांधी यांना शिक्षेच्‍या भीतीने अन्‍य २ प्रकरणांत न्‍यायालयासमोर क्षमा मागावी लागली आहे. या विरोधाभासाविषयी त्‍यांना ‘मनाची किंवा जनाची’ लाज वाटत नसली, तरी जनता काही ते विसरलेली नाही. विदेशात जाऊन देशाचा अवमान करणरे राहुल गांधी यांना राष्‍ट्रभक्‍तीचा अत्‍युच्‍च आदर्श असणार्‍यांविषयी बोलण्‍याचा काय अधिकार आहे ? शिक्षेला घाबरणारे राहुल गांधी यांची काळ्‍या पाण्‍याची शिक्षा भोगणार्‍यांविषयी शब्‍दही उच्‍चारण्‍याची पात्रता नाही, हे खरेतर काँग्रेसच्‍या नेत्‍यांसह सर्व जण जाणतात; पण कदाचित् त्‍यांनाही अन्‍य नेतृत्‍व नसल्‍यामुळे त्‍यांचाही नाईलाज झाला आहे. काँग्रेसचे एक नेते आशिष देशमुख यांनीही भाजपचीच ‘री’ ओढून ‘मोदींचा अवमान हा समस्‍त अन्‍य मागासवर्गाचा अवमान’, असे म्‍हटले, यातच सर्व काही आले. शासनाने सावरकर यांच्‍याविषयी जोरदार भूमिका घेतल्‍याने उद्धव ठाकरे यांनाही त्‍यांची सध्‍याची भूमिका पालटून ‘सावरकर हे त्‍यांचेही दैवत आहे’, हे वारंवार स्‍पष्‍ट करावे लागले आणि सभांच्‍या फलकांवरील राहुल गांधी यांचे छायाचित्र काढावे लागले. हिंदुत्‍वाची केवळ बाजू राज्‍यकर्त्‍यांनी घेतली, तरी काय पालट होऊ शकतात, याचे हे उदाहरण आहे. ‘लोकशाही’ वाचवण्‍यासाठी हे करत आहे’, असे अगदी काँग्रेसच्‍या नेहमीच्‍या राजकीय थाटात बोलणार्‍या राहुल गांधी यांना देशाविषयी थोडे जरी प्रेम असते, तरी त्‍यांनी विदेशात जाऊन राष्‍ट्राचा अवमान केला नसता. असो. ‘वाईटातून चांगले होते’ म्‍हणतात, त्‍याप्रमाणे राहुल गांधी यांच्‍या हास्‍यास्‍पद वागण्‍यामुळे समाजातील थोड्या फार राष्‍ट्रजाणिवा असणार्‍या युवा पिढीला ‘सावरकर समजून घेणे’, ‘सावरकरांचा अभ्‍यास करणे’ आणि त्‍या निमित्ताने होणार्‍या वैचारिक उलथापालथीतून स्‍वतःची राष्‍ट्रीयत्‍वाची वैचारिक भूमिका सिद्ध करणे, हे शक्‍य होणार आहे. हिंदुद्वेष्‍टा काँग्रेस पक्ष नेतृत्‍वहीन होणे, ही राष्‍ट्रभक्‍त हिंदूंसाठी महत्त्वाची घटना आहे. याचे राजकीय पडसाद काय उमटायचे ते उमटतील; पण या निमित्ताने आज युवा पिढीने जे राष्‍ट्रीयत्‍वाचे विचार अंगीकारण्‍याची आवश्‍यकता आहे, त्‍यांना जाग येत आहे.

सावरकर विचारांच्‍या ‘भारतरत्नां’ची प्रतीक्षा !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘अखंड हिंदु राष्‍ट्र स्‍थापने’चा अत्‍यंत सुस्‍पष्‍ट उच्‍चार केला. राष्‍ट्राची संरक्षणविषयक भूमिकाही अत्‍यंत परखड आणि स्‍पष्‍ट होती. मोदी शासन त्‍या दिशेने पावले टाकत आहेच. जेव्‍हा आपण सावरकरांचे गौरवगान गातो, तेव्‍हा त्‍यांचा राष्‍ट्रासाठीचा त्‍याग आणि त्‍यांची ध्‍येयनिष्‍ठा, त्‍यांचे अलौकिक साहस, त्‍यांच्‍या मनाची प्रबळ इच्‍छाशक्‍ती आदी अनेक गुण आपल्‍यासमोर उभे रहातात. आजच्‍या युवा पिढीने त्‍यांचा आदर्श घेतला, तर खरोखरच स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अखंड हिंदु राष्‍ट्रा’चे स्‍वप्‍न पूर्ण होण्‍यास वेळ लागणार नाही. स्‍वातंत्र्यवीर सावरकरांसारखे महापुरुष निर्माण करण्‍याची ताकद या भारतभूमीमध्‍ये आहे. अशा अनेक पुत्रांची आज भारतभूमीला आवश्‍यकता आहे. भारताचे खरेखुरे रत्न असणारे क्रांतीसूर्य सावरकर यांच्‍या प्रखर राष्‍ट्रभक्‍त विचारांचे संस्‍कार निर्माण करण्‍यासाठी शासनाची ‘सावरकर गौरव यात्रा’ योगदान देणारी ठरो, हीच अपेक्षा !

‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’सह त्‍यांचे अखंड हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचे स्‍वप्‍नही साकार करावे, ही अपेक्षा !