मुंबई – नवी देहली येथील काँग्रेस कार्यालयात २५ मार्च या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणार्या पत्रकाराला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भाजपसाठी काम करता का ?’, असे बोलून अपमानित केले. या प्रकरणी ‘राहुल गांधी यांनी संबंधित पत्रकाराची क्षमा मागावी’, अशी मागणी मुंबई प्रेस क्लबने केली आहे.
पत्रकाराचे काम प्रश्न विचारणे हे आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला सन्मानाने आणि सभ्यतेने उत्तरे देणे, हे राजकीय नेत्यांचे कर्तव्य आहे; परंतु देशातील सर्वांत जुन्या राजकीय पक्षाचे नेते राहुल गांधी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या प्रतिष्ठेचा आदर करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वत:ची चूक मान्य करून संबंधित पत्रकारांची क्षमा मागावी, अशी भूमिका मुंबई प्रेस क्लबने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने खासदार म्हणून अपात्र ठरवल्याच्या लोकसभेच्या निर्णयाविषयी राहुल गांधी यांना प्रश्न विचारला. त्यावर तुम्ही थेट भाजपसाठी काम करत आहात का ? तसे असेल, तर पत्रकार म्हणवून घेऊ नका. छातीवर भाजपचे चिन्ह लावा, असे राहुल गांधी यांनी म्हटले. एवढे बोलल्यानंतर पुन्हा ‘हवा निघून गेली’, असेही राहुल गांधी यांनी पत्रकाराला म्हटले होते.