जागतिक उठाव हवा !

संपादकीय

वॉशिंग्टनस्थित भारतीय पत्रकार ललित झा (मध्यभागी) यांच्यावर खलिस्तान समर्थकांकडून आक्रमण; भारतीय दूतावासाने या हल्ल्याचा केला निषेध

लंडन आणि सॅन फ्रॅन्सिस्को या शहरांतील भारतीय दूतावासांच्या कार्यालयांवर आक्रमण केल्यानंतर खलिस्तानवाद्यांनी आता वॉशिंग्टन येथे चालू असलेल्या खलिस्तान समर्थकांच्या आंदोलनामध्ये एका भारतीय पत्रकारावर आक्रमण केले आहे. ललित झा असे या पत्रकाराचे नाव असून तो ‘पीटीआय’ या भारतीय वृत्तसंस्थेचा असल्याने हे थेट भारतावरील आक्रमण होय. गेल्या काही आठवड्यांमध्ये ऑस्ट्रेलियातील काही हिंदु मंदिरांवर खलिस्तानवाद्यांकडून करण्यात आलेली आक्रमणे ही हिंदूंसाठी धोकादायक आहेत. वर्ष १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा प्रतिशोध घेण्यासाठी १९८५ मध्ये खलिस्तानवाद्यांनी टोरंटो ते मुंबई असा प्रवास करणार्‍या ‘एअर इंडिया १८५’ या विमानात बाँबस्फोट घडवून त्यात असणार्‍या सर्व ३२९ प्रवाशांना ठार केले होते. भारताने विविध देशांमध्ये फोफावत चाललेल्या खलिस्तानी शक्तींचा तत्परतेने नायनाट केला नाही, तर अशा आक्रमणाची पुनरावृत्ती होऊ शकते, ही शक्यता कोण नाकारेल ?

परराष्ट्रनीतीत पालट आवश्यक !

भारताला धडा शिकवण्यासाठी पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.चे खलिस्तानवादी शक्तींना साहाय्य

ऑगस्ट २०१९ मध्ये जेव्हा भारताने काश्मीरला विशेषाधिकार प्रदान करणारे कलम ३७० रहित करून तेथे केंद्रशासनाचे जे ऐतिहासिक वर्चस्व प्रस्थापित केले, त्या वेळपासूनच जिहादी पाकच्या पायाखालची वाळू सरकली. हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांना अनेक मास नजरकैदेत ठेवल्याने पाकचे धाबे दणाणले. त्यातूनच भारताला धडा शिकवण्यासाठी पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.ने काम करण्यास आरंभ केला. कॅनडा, अमेरिका, ब्रिटन येथील खलिस्तानवादी शक्तींना साहाय्य पुरवून त्यांना पुन्हा एकदा भारतविरोधी कारवाया करण्यासाठी उकसवण्यात आले. कोरोनाकाळात याच खलिस्तानवाद्यांनी भारताविषयी जागतिक समुदायात विष कालवणारी धादांत खोटी माहिती देणारे व्हिडिओ प्रसृत केले. आता गेल्या काही मासांपासून त्यांनी रस्त्यावर उतरून भारताचा कथित अत्याचारी चेहरा जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. ब्रिटनमधील भारतीय दूतावासावरील आक्रमणाचा विरोध करत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ब्रिटीश सरकार सुरक्षेचे दायित्व पार पाडण्यास अपयशी ठरत असल्याचे रोखठोक प्रतिपादन केले आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजीत सिंह संधू हे स्वत: शीख असल्याने त्यांच्या माध्यमातून अमेरिकेत चालू असलेल्या खलिस्तानी कारवायांच्या विरोधात व्हाईट हाऊसवर परिणामकारक आसूड ओढणे शक्य आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या नुकत्याच झालेल्या भारतीय दौर्‍याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना ‘तेथील मंदिरे आणि भारतीय यांच्या रक्षणाकडे लक्ष द्यावे’, असे स्पष्टपणे सांगितले. शस्त्रधार्‍यांना शस्त्रांचीच भाषा उमगते ! त्यामुळे केवळ कठोर वक्तव्ये करणे पुरेसे नसून संबंधित देशांनी भारताच्या चिंतेला गांभीर्याने घेऊन खलिस्तान्यांवर कारवाया करण्यासाठी भारताने त्यांना भाग पाडले पाहिजे. भारताने खलिस्तानवादाचा नायनाट करण्यासाठी स्वत:च्या परराष्ट्रनीतीत आमूलाग्र पालट करणे त्यासाठी आवश्यक बनले आहे. यामध्ये पाकला एकटे पाडण्याचा भाग हा पर्यायाने आलाच !

लढ्याची व्याप्ती वाढवा !

खलिस्तानवादी भारतातील आंतरिक स्थितीही अस्थिर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात पंजाब पोलीस आणि केंद्रशासन करत असलेल्या कारवायांचा बागुलबुवा केला जात आहे. त्यांच्या समर्थनार्थच विविध देशांमध्ये रणकंदन माजवले जात आहे. त्यामुळे खलिस्तानवादी चळवळीसारख्या षड्यंत्राला ठेचण्यासाठी केवळ शस्त्रवापर पुरेसा नाही. पंजाबसह देशभरातील राष्ट्रनिष्ठ शिखांनी संघटित होऊन खलिस्तानवाद्यांचा विरोध करणे आवश्यक आहे. यासाठी ‘पोलीस आणि केंद्रशासन अशा राष्ट्रनिष्ठ शिखांचे संरक्षण करील का ?’ हाही प्रश्न आहे. जागतिक स्तरावरही राष्ट्रप्रेमी शीख बांधव आणि हिंदू यांनी एकत्र येऊन खलिस्तानवादी चळवळ ही कशा प्रकारे मानवताविरोधी, आतंकवादी नि हिंसक आहे, हे दाखवून द्यायला हवे. भारतीय दूतावासांनी यासाठी त्यांना साहाय्य करणे आवश्यक आहे.

वैचारिक परिवर्तन !

मुळात शिखांचा गौरवशाली इतिहास हा अतुलनीय शौर्य आणि तेजस्वी आध्यात्मिक गुरूंची शिकवण यांवर आधारलेला आहे. गेल्या ५०० वर्षांत असंख्य शिखांनी भारताच्या रक्षणार्थ स्वतःचे सर्वस्व अर्पित केले. गुरु तेगबहाद्दुर यांच्यासारख्या अनेक शीख गुरूंची इस्लामी आक्रमणकर्त्यांनी हत्या केली. आज त्यांचेच वंशज खलिस्तानाच्या मागणीसाठी त्यांच्या शत्रूंच्या वंशजांशी हातमिळवणी करत आहेत ? हे शीख गुरूंच्या बलीदानास लांच्छनास्पद नव्हे का ? ज्या हिंदु धर्माच्या रक्षणार्थ शीख पंथाची स्थापना करण्यात आली, त्या शिखांच्या मनात ब्रिटिशांनी हिंदुविरोधी बीज पेरले आणि त्याचाच वृक्ष म्हणजे आजची खलिस्तानवादी चळवळ ! ब्रिटीश काळात मॅक्स अर्थर मॅकॉलिफ या ख्रिस्ती मिशनरी आणि शासकाने शीख अन् हिंदू यांच्यात दुही माजवण्याचा विडा उचलला. वीर सिंह या भारतीय शीख प्रशासकीय अधिकार्‍याला हाताशी धरून ‘शीख धर्म हा हिंदु धर्मापासून कसा वेगळा आहे’, हे दाखवण्यासाठी खोटा इतिहास लिहिण्यात आला. हे महत्त्वपूर्ण ‘सबव्हर्जन’ आज भारताच्या आणखी एका फाळणीला वाट करून देत आहे. त्यामुळे खलिस्तानवाद्यांच्या या चळवळीला ठेचण्यासाठी हे वैचारिक प्रदूषण उलथवून लावून भरकटलेल्या शिखांना भारताच्या बाजूने उभे करणे हितावह असणार आहे. या मूलभूत पालटासाठी आता मोदी शासनाने मोर्चेबांधणी केली, तरच खलिस्तानवादावर कायमची जरब बसणार आहे !

खलिस्तानच्या रूपात भारताची आणखी एक फाळणी टाळण्यासाठी हिंदू आणि राष्ट्रनिष्ठ शीख यांचा जागतिक उठाव आवश्यक !