पाकिस्तानमध्ये श्री हनुमानाचा अवमान करणार्‍या मुसलमान पत्रकाराला अटक !

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी पत्रकार असलम बलोच यांना सिंध पोलिसांनी अटक केली आहे. मीरपूर खास पंचायतीचे उपसरपंच रमेश कुमार यांनी बलोच यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. बलोच यांनी त्यांच्या फेसबुकच्या खात्यावर श्री हनुमानाच्या चेहर्‍यावर पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा चेहरा लावलेले चित्र प्रसारित केले होते. ‘यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून २ समाजांमध्ये तेड निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे’, असे रमेश कुमार यांनी तक्रारीत म्हटले होते.

१. बीबीसीने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार पाकमध्ये ईशनिंदा कायदा आहे. या कायद्याचा वापर पाकमधील अल्पसंख्यांकांच्या विरोधात होतो; मात्र सध्या काही प्रकरणांमध्ये हा कायदा मुसलमानांच्या विरोधातही लावण्यात आला आहे.

(सौजन्य : Newsroom Post) 

पाकिस्तानी पत्रकाराने हिंदूंची क्षमा मागितली !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अटक केल्यानंतर पत्रकार असलम बलोच यांनी हिंदूंनी क्षमा मागितली आहे. ‘कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. हे चित्र अन्य कुणी बनवले होते, ते मी ‘शेअर’ केले. मी हिंदूंच्या कार्यक्रमांना जात असतो’, असे त्यांनी म्हटले आहे.

२. बलोच यांनी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर तेथील हिंदूंनी सामाजिक माध्यमांवर बलोच यांना विरोध करण्यास आरंभ केला. त्यानंतर पाकचे अल्पसंख्यांक मंत्री ज्ञानचंद असरानी यांनी या प्रकरणी लक्ष घालून बलोच यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. ‘अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याची कुणालाही अनुमती नाही. असे करून समाजातील सद्भाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

३. पाकिस्तानी पत्रकार वीनगास यांनी ट्वीट करत म्हटले की, सध्या सामाजिक माध्यमांमधून हिंदूंच्या देवतांचे आपत्तीजनक चित्रे प्रसारित करणे, ही पाकमध्ये सामान्य गोष्ट बनली आहे.

स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्यांनी २ छायाचित्रे प्रसारित केली. एका चित्रामध्ये श्री हनुमानाच्या चेहर्‍याच्या ठिकाणी एका मौलानाचा चेहरा लावण्यात आले होते, तर दुसर्‍या एका छायाचित्रात श्री महाकालीदेवीच्या चेहर्‍यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ यांचा चेहरा लावण्यात आला होता.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका

भारतात विविध माध्यमांतून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात; मात्र बहुतांश वेळा संबंधितांवर कारवाई होत नाही. पाकमधील या कारवाईवरून भारताने बोध घ्यावा !