गोवा : मोरजी येथे रशियाच्या महिलेला मारहाण

२ परप्रांतीय हॉटेल कर्मचारी कह्यात

(प्रतिकात्मक चित्र)

पेडणे, २५ मार्च (वार्ता.) – राज्यात येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांना मारहाण करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. सरकारने अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची चेतावणी दिलेली असतांनाच २५ मार्च या दिवशी मोरजी येथे रशियाच्या महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधील २ कर्मचार्‍यांनी त्यांना मारहाण केली.

 

या प्रकरणी तक्रार नोंद झाल्यानंतर पेडणे पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचारी अविशान गोरिया (वय २९ वर्षे, रहाणारा बदलापूर) आणि महंमद फैजल खान (वय २६ वर्षे, रहाणारा झारखंड) यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कह्यात घेतले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पीडित महिला मोरजी येथील ‘ग्रँड इन’ हॉटेलमध्ये इगूल इलव्हेटीनोव्हा येथे वास्तव्यास होती. २४ मार्च या दिवशी ती रहात असलेल्या खोलीच्या खिडकीतून संबंधित २ संशयित कर्मचार्‍यांनी प्रवेश करून तिचे नाक आणि तोंड दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने आरडाओरड केल्याने आजबाजूचे पर्यटक जमा झाले. त्यावर दोन्ही संशयितांनी तेथून पळ काढला.

संपादकीय भूमिका

अशा घटनांमुळे गोव्याचे नाव जगभरात अपकीर्त होते !