राज्य महिला आयोगाचे काम पुरुषांच्या विरोधात नसून ते समाजाच्या विकृतीच्या विरोधात आहे ! – रूपाली चाकणकर

महिलांवरील अत्याचाराचे संग्रहित चित्र

पुणे – महिलांचे प्रश्न जेव्हा पुरुष समजून घेतील आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा महिलांचे निम्म्याहून अधिक प्रश्न संपलेले असतील. राज्य महिला आयोग हा पुरुषांच्या विरोधात नसून आमचे काम समाजाच्या विकृतीच्या विरोधात आहे. अन्याय करणार्‍यांपेक्षा सहन करणारा जास्त दोषी असतो, त्यामुळे प्रत्येक वेळेला साहाय्याला कुणी येईल ही भावना महिलांनी काढून टाकून स्वतःच्या आयुष्याची लढाई स्वतःच लढली पाहिजे. त्यांना संकटांचा सामना करता आला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले. नर्‍हे (धायरी) येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने‘’सॅनिटरी नॅपकिन बँक आपल्या आरोग्यासाठी’ या उपक्रमाच्या अंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला आरोग्य विभागाच्या डॉ. प्रीती संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अधिवक्ता शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. शहरापेक्षा आदिवासी पाड्यांवर मुलींचे प्रमाण अधिक आहे. आजही समाजात वंशाला वारसदार म्हणून मुलगा हवा असतो. यासाठी मुलींची हत्या केली जाते. समाजात अंधश्रद्धा आजही मोठ्या प्रमाणावर आहे, असेही चाकणकर म्हणाल्या.