पुतिन यांच्या अटकेचा आदेश देणार्‍या न्यायाधिशांना क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करण्याची रशियाची धमकी

रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव

मॉस्को (रशिया) – युक्रेनमध्ये होणार्‍या युद्धाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेच उत्तरदायी असल्याचे ठरवत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. यावरून रशियाने थेट या न्यायालयाच्या न्यायाधिशांनाच क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी टेलिग्राम पोस्टद्वारे ही धमकी दिली.

मेदवेदेव म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय ही एक निरुपयोगी संस्था आहे. या न्यायालयातील न्यायाधिशांनी आता सातत्याने आकाशाकडे लक्ष ठेवायला हवे. आम्ही समुद्रात युद्धनौकेवरून डागलेले क्षेपणास्त्र हेग (नेदरलँड) येथील न्यायालयाच्या मुख्यालयावर केव्हाही धडकू शकते.’’ दिमित्री मेदवेदेव यांनी यापूर्वी पुतिन यांना बजावलेल्या वॉरंटची तुलना टॉयलेट पेपरशी केली होती.